Government cannot afford if the Maratha community takes up arms: Anand Kashid
बार्शी विशेष : शांततेत ५८ मोर्चे काढलेला मराठा समाज आजही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहे, त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, नाहीतर समाजाने हातात शस्त्र घेतल्यास तुम्हाला परवडणार नाही, असा परखड इशारा आनंद काशीद यांनी राज्य शासनाला दिला.
मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी आज बार्शी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले त्यावेळी काशीद बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला या राज्यामध्ये शांतता हवी आहे, म्हणून मराठा समाज लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. आज मराठा समाज अर्ध नग्न आंदोलन करू लागलेला आहे, जर आरक्षणाचा प्रश्न नाही सोडवला तर येणाऱ्या काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्यांचे राजकीय बुरखे फाडून त्यांना नग्न केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही. त्यामुळे चालू अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती मराठा समाज हात जोडून करत आहे.
बार्शी तहसील कार्यालयासमोर मागील ३८ दिवसापासून साखळी उपोषण सुरू असून, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पांडुरंग घोलप, बालाजी डोईफोडे, अंकुश भिसे, विकास माने, संजीवनी ताई बारंगुळे, कल्याण घळके यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
