बार्शीतील उद्योग समूहाला दहा लाखांना फसवले; कर्मचाऱ्यानेच केला विश्वासघात

Admin
0

 

Ten lakhs defrauded industry group in Barshi; Betrayed by the employee

Ten lakhs defrauded industry group in Barshi; Betrayed by the employee

बार्शी विशेष : कंपनीतील कर्मचाऱ्याने बनावट कॅश व्हाऊचर तयार करुन बार्शीतील एका उद्योग समूहाची दहा लाखापेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनीचे व्यवस्थापक विजयकुमार लढ्ढा यांनी शहर पोलिस ठाण्यात या फसवणूकीची तक्रार दिली आहे.

या फिर्यादीनुसार, मधूसूदन चांडक यांच्या मालकीच्या श्रीराम फिलामेंट्स अँड रोप्स प्रा. लि., श्री व्यंकटेश फिलामेंट्स प्रा. लि., मारुती रोप्स इंडिया प्रा. लि. व मारुती टेक्नोफॅब इंडस्ट्रीज प्रा. लि. या उद्योग समूहातून नायलॉन दोर व वूव्हन बॅग्जचे उत्पादन केले जाते. 

या कंपनीत मागील दहा वर्षापासून काम करणाऱ्या जाकीर इमाम मुलाणी याच्याकडे कंपनीस लागणारे कार्यालयीन व बांधकामास लागणारे साहित्य स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्याचे काम देण्यात आले होते. ते जबाबदारीने करुन त्याने विश्वास संपादन केला होता.

दि. २७ जून रोजी जाकीर मुलाणी व संचालकांच्या सहीचे एक कॅश व्हाऊचर विड्रॉलसाठी आले होते, त्यावर मान्यताप्राप्त व्यवस्थापकाच्या सह्या नसल्याने व्यवस्थापनाला त्याबाबत संशय आला. त्यासंदर्भात मुलाणीकडे विचारणा केली असता, माझ्याकडून चुकून सहाय्यक व्यवस्थापकाच्या सह्या घेण्याचे राहिल्यामुळे मी त्यावर सह्या केल्याचे त्याने सांगितले.

त्यामुळे त्याने विड्रॉल केलेल्या व्हाऊचर्सची तपासणी केली असता, रकमेत तफावत व सहाय्यक व्यवस्थापकाच्या बनावट सह्या आढळून आल्या. त्याने १८ ऑगस्ट २०२२ ते २७ जून २०२३ या कालावधीत वेळोवेळी पाहिजे ते आकडे टाकून बनावट कॅश व्हाऊचर्स तयार करुन त्याद्वारे कंपनीतून रक्कम काढून घेतल्याचे दिसून आले.

व्यवस्थापनाने केलेल्या तपासणीत श्रीराम फिलामेंट्स अँड रोप्स प्रा. लि. मधून रु. १,४४,६६०, श्री व्यंकटेश फिलामेंट्स प्रा. लि. मधून रु. २३,४९०, मारुती रोप्स इंडिया प्रा. लि. मधून रु. ३,०२,३५० आणि मारुती टेक्नोफॅब इंडस्ट्रीज प्रा. लि. मधून रु. ६,१८,६८० याप्रकारे एकूण १० लाख ८९ हजार १८० रुपये त्याने काढून घेतल्याचे निष्पन्न झाले.

उद्योग समूह संचालक मधूसूदन चांडक यांनी त्यास समक्ष बोलावून कंपनीच्या मान्यताप्राप्त रजिस्टरबाबत विचारणा केली असता, त्याने फसवणूक केल्याचे मान्य करुन कंपनीचे रजिस्टर व रक्कम परत करतो असे सांगितले. नंतर त्याबद्दल त्याचेकडे विचारणा करेल तेव्हा मी नक्की पैसे देतो माझ्यावर विश्वास ठेवा असे तो सांगत राहिला. परंतु वारंवार मागणी करुनही त्याने रजिस्टर व रक्कम परत केली नाहीच, उलट मी पैसे देणार नाही काय करायचे ते करा अशी दमदाटी तो करु लागला. 

कंपनी व्यवस्थापक विजयकुमार ठाकूरदास लढ्ढा (वय ४२) रा. पाटील प्लॉट, कुर्डुवाडी रोड, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात जाकीर मुलाणी, रा. मंगळवार पेठ, बार्शी विरोधात भा.दं.वि. १८६० कलम ४०८,४२०,४६७ व ४७७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)