Goods worth lakhs including ganja seized in Barshi
बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून केलेल्या कारवाईत विक्रीसाठी गांजा घेऊन येणाऱ्या ऋत्विक मानतेश सोनेगार (वय २१) रा. मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर याला अटक करुन त्याचेकडून गांजा व दुचाकीसह लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत माहिती अशी की, उपळाई रस्त्यावरील माढेश्वरी मंगल कार्यालयासमोर एक इसम गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला. तेव्हा तेथे आलेल्या संशयिताने पोलिस येत असल्याचे बघून दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला ती संधी न देता पोलिसांनी थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्या दुचाकीवर असलेल्या बॅगमध्ये ६२२९ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करुन त्याचेकडील गांजा व दुचाकी मिळून १ लाख ७ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ऋत्विक मानतेश सोनेगार यास अटक केली.
दि. १३ डिसेंबरच्या रात्री ९ चे सुमारास सपोनि ढेरे, सपोफौ वरपे, पोहकॉ माने, पोना पवार, पोकॉ जाधव, देशमुख, साळवी, मुलाणी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोकॉ अर्जुन गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
