Accidental death of father who returns after buying daughter's marriage clothes; Incident near Barshi
बार्शी विशेष : मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदी करुन गावाकडे दुचाकीवरुन परतणाऱ्या वधूपित्यावर काळाने घाला घातला. टेंपो व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना दि. १ डिसेंबर रोजी बार्शी धाराशिव रस्त्यावरील कदम वस्तीजवळ सायंकाळी ७ चे सुमारास घडली. संदीप मारुती गादेकर (४५) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा लहान भाऊ किरण मारुती गादेकर (वय ४२) रा. कारी, ता. जि. धाराशिव यांनी या अपघाताची फिर्याद बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.
या घटनेची माहिती अशी की, संदीप मारुती गादेकर (वय ४५) रा. कारी, ता. जि. धाराशिव यांच्या मुलीचे लग्न असल्याने तिच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी संदीप गादेकर त्यांचा मित्र गोविंद डोके यांची मोटरसायकल (क्र. एमएच-२५-एटी ३०४०) घेऊन मुलगा तेजस सह दोघेजण बार्शीला कपडे खरेदीसाठी गेले होते. सायंकाळी साडेसहाचे सुमारास तेजस बस्ता घेऊन घरी परतला, त्यावेळी किरण गादेकर यांनी त्याला बापू कुठे आहेत असे विचारले. तेव्हा ते पाठीमागून मोटरसायकलवरुन येणार आहेत असे तेजसने सांगितले.
सायंकाळी सव्वासातचे सुमारास किरण यांना गावातील अनंत डोके यांचा फोन आला, त्यांनी सांगितले की मी बार्शीहून गावाकडे येत असताना माझ्यासमोर कदम वस्ती सोयाबीन मिल जवळ तुझा मोठा भाऊ संदीप मोटरसायकलवरुन जात होता. त्यावेळी सायंकाळी सातच्या सुमारास शेलगाव (मा) कडून बार्शीकडे जाणाऱ्या टेंपोची समोरुन धडक लागून तो गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची बातमी समजताच गावातील लोकांसह किरण गादेकर अपघातस्थळी पोहोचले तेव्हा, त्यांचा भाऊ संदीप हा रस्त्याच्या उत्तर धावपट्टीवर डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन व अति रक्तस्त्राव होऊन मयत झालेला दिसला. बाजूला मोटरसायकल मोडतोड होऊन पडलेली होती. धडक दिलेला टेंपो (क्र. एमएच-२५-एजे-५१४०) रस्त्याच्या कडेला उभा होता. अपघातस्थळी आलेल्या पोलिसांनी बोलविलेल्या खासगी रुग्णवाहिकेतून संदीपचे प्रेत बार्शी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. बार्शी तालुका पोलिसांनी अनोळखी टेंपो चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
