नोटा खाली पडल्याचे सांगून १ लाख ६० हजार रुपये लांबविले; बार्शीच्या स्टेट बँकेतील प्रकार

Admin
0

 

1 lakh 60 thousand rupees were stolen; Incidents at the State Bank of Barshi

बार्शी विशेष : नोटा खाली पडल्याचे सांगून शेतकऱ्याचे १ लाख ६० हजार रुपये लांबविल्याचा प्रकार बार्शीतील स्टेट बँकेत घडला. सुभाष अनंतराव पाटील (वय ६०) रा. पिंपरी (आर), ता. बार्शी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 


याबाबत हकिगत अशी की, पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. बचत खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम काढून घेण्यासाठी ते ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ चे सुमारास बार्शीच्या बस स्थानकासमोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आले होते. 


कॅशियरकडून घेतलेल्या ५०० रुपयांच्या २०० नोटा व २०० रुपयांच्या ३०० नोटा मिळून १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम हातातील कापडी पिशवीत ठेवून ते कॅश काऊंटरसमोरील खुर्चीवर बसले. त्यावेळी रक्कम, पासबुक, चेकबुक असलेली पिशवी त्यांनी शेजारील खुर्चीवर ठेवली होती. 


त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका अनोळखी इसमाने पाटील यांच्या खांद्याला हात लावून तुमचे पैसे पडले आहेत असे सांगितले, म्हणून त्यांनी वाकून पाहिले असता खुर्चीच्या बाजूला २० रुपयांच्या पाच नोटा पडलेल्या दिसल्या. त्या नोटा घेण्यासाठी ते खाली वाकताच त्या इसमाने पाटील यांची रक्कम असलेली पिशवी घेऊन पोबारा केला.


सुभाष पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसात अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरु आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)