बार्शी विशेष : गावाकडे जाण्यासाठी बस नसल्यामुळे रात्री बस स्थानकावर झोपलेल्या प्रवाश्याच्या खिशातील रक्कम आणि मोबाईल पळविणाऱ्या चोरट्यांना बार्शी शहर पोलिसांनी दोन तासात अटक करुन त्यांचेकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले.
याबाबतची माहिती अशी की, सुनिल गोरख चव्हाण (वय ३६) रा. चिखर्डे हे दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी गावाकडे जाण्यास बस नसल्याने, मध्यरात्री बार्शी बस स्थानकावर झोपले होते. त्यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचेशी झटापट करुन त्यांच्या खिशातील रोख रक्कम तेरा हजार रुपये आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
याबाबतची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून सूरज विजय कांबळे (वय २७) रा. पाटील चाळ, तुळजापूर रस्ता, बार्शी व शाहरुख युन्नुस शेख (वय २४) रा. भवानी पेठ, बार्शी या दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांचेकडून चोरीस गेलेले तेरा हजार रुपये आणि मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन, त्या दोघांना अटक केली.
सदरची कामगिरी पो. अधिक्षक, अप्पर पो. अधिक्षक, उपविभागीय पो. अधिकारी जालिंधर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष गिरीगोसावी, सपोनि दिलीप ढेरे, पोउनि महेश गळगटे आणि गुन्हे शोध शाखेच्या पथकाने पार पाडली.
