कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने बार्शीतील महिलेची लाखो रुपयांची फसवणूक

Admin
0

A woman in Barshi was cheated of Rs 4 lakh on the pretext of getting a loan

बार्शी विशेष : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विधवा पुनर्वसन योजनेतून ४५ लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत, बार्शीतील एका विधवा महिलेची ४ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा बार्शी पोलिसात दाखल झाला आहे.

यासंदर्भात अंजली संजय धांडोरे, बार्शी यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २००७ साली माझ्या पतीचे निधन झाले. तेव्हापासून मी माहेरी आईकडे राहात असून, बार्शीतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामास असताना, सोनल चौरे उर्फ फरजाना हिला घर भाड्याने पाहिजे असल्याच्या कारणावरुन तिच्याशी माझी ओळख झाली. 

पुढे त्या ओळखीतून सोनलने मला सांगतले की, मी मागील दहा वर्षापासून बचत गट चालवत आहे, तसेच अण्णाभाऊ साठे विधवा पुनर्वसनाचे काम करते. तू दीड लाख रुपये आणि आवश्यक ती कागदपत्रे दिल्यास मंडळाच्या विधवा पुनर्वसन योजनेतून तुला पंचेचाळीस लाख रुपये मिळवून देते, तसेच बार्शी नगरपरिषदेकडून चाळीस टक्के सबसिडीने सहा लाख रुपये कर्ज मंजूर करुन देते असे सांगितले. तिच्या बोलण्याची खात्री पटण्यासाठी तिने मला एका महिलेचे नाव सांगतिले, त्या महिलेकडे चौकशी करुन आणि सोनलवर विश्वास ठेवून मी २०१७ पासून आजतागायत वेळोवेळी एकूण ४ लाख ४२ हजार रुपये तिला दिले.

त्यानंतर बराच कालावधी लोटूनही व वारंवार विचारणा करुनही तिच्याकडून काम होत नसल्यामुळे, मी सोलापूर येथील समाजकल्याण विभागाच्या वसंतराव नाईक कक्षात जाऊन चौकशी केली असता, अशा प्रकारची कोणतीही योजना नाही, व तसे कोणी सांगत असेल तर ती फसवणूक आहे असे मला तिथे समजले. 

त्यामुळे सोनलकडे मी पैसे परत देण्याची मागणी केली असता, तिने टाळाटाळ सुरु केली, आणि सतत पैसे परत मागू नको, नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करेन अशी मला धमकी दिली. 

अशा आशयाची फिर्याद अंजली संजय धांडोरे (वय ४५) रा. त्रिमूर्ती हाऊसिंग सोसायटी, कुर्डुवाडी रस्ता, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)