कर सल्लागाराने केली बार्शीतील व्यापाऱ्याची २ कोटींची फसवणूक

Admin
0

 

A tax consultant cheated a businessman in Barshi of 2 crores

बार्शी विशेष : कर भरण्यासाठी व्यापाऱ्याकडून घेतलेल्या २ कोटी २२ लाख रुपयापैकी २५ लाखांचा कर भरणा करुन राहिलेल्या रक्कमेची कर सल्लागाराने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे बार्शी शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, यतीशकुमार बाबूराव गायकवाड यांचे बार्शीतील मार्केट यार्ड येथे इलेक्ट्रीक साहित्य व केबलचा घाऊक व्यापार आहे. नितीन (गणेश) जयप्रकाश बकाल हे त्यांच्या व्यवसायाकरिता कर सल्लागार म्हणून काम पाहतात.

दि. १३ ते १५ नोव्हेंबर २०१८ च्या दरम्यान, सोलापूर येथील मूल्यवर्धित कर विभागाच्या तपास पथकाने गायकवाड यांच्या दुकानी व निवासस्थानी भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी गायकवाड यांनी बकाल यांना बोलावून अधिकाऱ्यांना हिशोबाची कागदपत्रे दाखविली असता, त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे सांगून पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्रे ताब्यात घेतली आणि कर, दंड भरण्यास सांगितले.

सदर कर, दंड भरण्यासाठी गायकवाड यांनी कर सल्लागार बकाल यांना, ५०, ३० व २० लाख रुपयांचे एकूण १ कोटी रुपयांचे ३ धनादेश दिले. त्यावेळी सदर रक्कम धनादेशाद्वारे भरतो असे बकाल यांनी सांगितले, परंतु दोनच दिवसांनी बकाल यांनी कर रोखीने भरावा लागेल असे सांगत दि. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी गायकवाड यांचेकडून ३० लाख रुपये रोखीने घेतले.

पुढे काही दिवसांनी, तुम्हाला एकूण १० कोटी रुपये कर व दंड भरावा लागणार होता, पण मी २ कोटी २५ लाख रुपये भरुन सगळे निरंक केले आहे, असे म्हणून बकाल यांनी गायकवाड यांना राहिलेली रक्कम मागितली. 

त्यावर गायकवाड यांनी माझे उत्पन्नच १० कोटी नाही, तर मला १० कोटींचा कर आणि दंड कसा लागेल असा प्रश्न उपस्थित करुन बकाल यांना कर कार्यालयाकडून त्यासंदर्भातील कागदपत्रांची मागणी करण्यास सांगितले. त्यावेळी बकाल यांनी तशी कागदपत्रे मिळत नसतात, उगाच त्या भानगडीत पडू नका, अधिकारी नाराज होतील असे सांगून टाळाटाळ केली. परंतु मला एवढा कर आणि दंड आकारणी होऊच शकत नाही अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली. त्यावेळी जर कर कार्यालयाकडून काही कारवाई झालीच तर होणाऱ्या परिणामास तुमचे तुम्हीच जबाबदार राहताल अशी भिती बकाल यांनी घातल्यामुळे, धास्तीने उर्वरित रक्कम धनादेशाने देण्यास गायकवाड तयार झाले.

परंतु बकाल यांनी सदर रक्कम धनादेशाऐवजी रोखीने देण्यास सांगितले. त्याप्रमाणे गायकवाड यांनी दि. ३० डिसेंबर २०१८ ते १३ सप्टेंबर २०२० या कालावधीत वेळोवेळी डायरीवर नोंदी करुन बकाल यांच्या सह्या घेऊन रोख स्वरुपात एकूण १ कोटी ९६ लाख ७७ हजार रुपये दिले. तसेच दि. २० जून २०२० ते १ जुलै २०२० या कालावधीत एकूण २५ लाख २२ हजार ७९८ रुपये धनादेशाद्वारे दिले.

याप्रमाणे दि. १७ नोव्हेंबर २०१८ ते १ जुलै २०२० दरम्यान बकाल यांनी रोखीने व धनादेशाद्वारे एकूण २ कोटी २१ लाख ९९ हजार ७९८ रुपये कर व दंड भरण्यासाठी गायकवाड यांचेकडून घेतले. त्यापैकी केवळ २५ लाख २२ हजार ७९८ रुपयांचा कर व दंडापोटी भरणा केल्याच्या चलन पावत्या गायकवाड यांना दिल्या. उर्वरित १ कोटी ९६ लाख ७७ हजार रुपयांचा कर, दंड भरलेल्या चलनांची मागणी केली असता, बकाल यांनी टाळाटाळ केली. 

त्यामुळे फसवणूक झाल्याची शंका आल्याने गायकवाड यांनी सोलापूर येथील कर कार्यालयात जाऊन तपास पथकाने नेलेल्या कागदपत्रांची मागणी केली असता सदर कागदपत्रे बकाल घेऊन गेल्याचे तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितले व त्याबद्दलची पोहोच दाखविली. मात्र कागदपत्रांबद्दल विचारणा केली असता, बकाल यांनी नकार दिला.

यतीशकुमार बाबूराव गायकवाड (वय ५१) रा. मांगडे चाळ, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात नितीन बकाल, रा. बार्शी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो.नि. संतोष गिरीगोसावी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)