चोरीच्या दुचाकीसह दोन संशयित बार्शी पोलिसांच्या ताब्यात

Admin
0

 

Two suspects with stolen bike in custody of Barshi police

बार्शी विशेष : दोन चोरीच्या दुचाकीसह दोन संशयितांना ताब्यात घेण्यात बार्शी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे.

दि. ४ जुलै २०२३ रोजी रात्री ११ चे सुमारास, ताडसौंदणे बार्शी रस्त्यावरुन दोन इसम चोरीच्या मोटरसायकल घेऊन जाणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर रस्त्यावर नजर ठेवली असता, दोन संशयित इसम दोन मोटरसायकलवरुन बार्शीच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच वेगाने निघून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या दोन संशयितांना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. 

विचारपूस दरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यांना बार्शी शहर पोलिस ठाण्यात आणून चौकशी असता, त्यांच्याकडे आढळलेल्या बजाज पल्सर व होंडा डिलक्स या दोन्ही मोटरसायकल पुण्यातून चोरीस गेल्याच्या तक्रारी हडपसर व डेक्कन पोलीस ठाणे पुणे येथे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. 

प्रथमेश सुरेश उर्फ प्रताप पवार व सचिन रोहिदास डोकडे (दोघेही रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून त्यांचेकडून सुमारे ७० हजार रुपये किंमतीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पो. अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, पो.नि. संतोष गिरीगोसावी यांचे मार्गदर्शनाखाली गन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोफौ अजित वरपे, शैलेश चौगुले, अमोल माने, मनिष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, रविकांत लगदिवे, सचिन देशमुख अविनाश पवार व अंकुश जाधव यांनी केली.

नागरिकांना आवाहन

वाहन खरेदी करताना कागदपत्रांची खात्री करावी, तसेच कुणी विना कागदपत्र वाहन कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करत असेल तर नागरिकांनी त्याबाबत पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)