बार्शी विशेष : आषाढी एकादशीनिमित्त भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी जसे पंढरपूर येथे गर्दी करतात तशीच स्थानिक मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते.
बार्शी तालुक्यातील वैराग पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धामणगांव येथील संत माणकोजी बोधले महाराजांच्या विठ्ठल मंदिरामध्ये पंढरपूरप्रमाणे पाच दिवस कीर्तन, प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमाची जणू यात्राच भरते. बार्शी तालुक्यातून व अनेक गांवातून भाविक भक्त विठूरायाच्या व संत दर्शनासाठी धामणगांवला येतात.
आषाढी एकादशी दिवशी येथील दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका भाविक महिलेस अचानक चक्कर आली. तेथे कर्तव्य बजावत असलेले पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या लक्षात ही बाब आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब व विचार न करता त्या महिलेला त्वरित खांद्यावर उचलून घेऊन वैद्याकडे नेऊन उपचार केले.
पोलीस शिंदे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान पाहून, 'विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या माऊलीला चक्कर आली, धावली मदतीसाठी पोलिस रुपी विठू माऊली' अशी चर्चा तेथे उपस्थित भाविकांतून होत होती.
