बार्शी विशेष (वाडी रत्नागिरी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत दख्खनचा राजा श्री जोतिबांच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली असून, जोतिबाच्या नावानं चांगभलं चा गजर करत लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. मानाच्या सर्व सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. जोतिबा डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. बुधवार ५ एप्रिल २०२३ हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.
यात्रेसाठी प्रशासनाची मागील महिनाभरापासून सुरु असलेली तयारी पूर्ण झाली आहे. जोतिबा मंदिर व यमाई मंदिर शिखरांची पाकाळणी, रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. भाविकांच्या सोयीसाठी नवीन दर्शन मंडपातून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर व वाहनतळ या ठिकाणी जाताना भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. दर्शनासाठी ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात येत आहेत. वाहने उभी करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने सुयोग्य वाहनतळ बनविण्यात आले असून, त्याठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळापासून मोफत बससेवा सुरु करण्यात आली आहे. जागोजागी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
केदारलिंग देवस्थान समितीने चैत्र यात्रेचे आयोजन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसर, वाहनतळ व डोंगरावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलीस, होमगार्ड, स्वयंसेवकांसह, खासगी सिक्युरिटी गार्ड्सचा पुरेसा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन, केदारलिंग देवस्थान प्रभारी दीपक म्हेतर यांनी केले आहे.
हा QR कोड स्कॅन करुन श्री जोतिबा आरती मोफत डाऊनलोड करुन घेता येईल. डाऊनलोड लिंक Description दिलेली आहे.

