सायबर पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासवत महिलेला ९१ लाखांना फसवले

Admin
0

 

91 lakh duped a woman by pretending to be a cyber police officer

बार्शी विशेष : अंधेरी येथील सायबर पोलिस ठाण्यातून पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलतोय अशी बतावणी करत, पुण्यात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची ९१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाची हकिगत अशी की, पुण्याच्या अरण्येश्वर येथील एका सोसायटीत वास्तव्यास असलेल्या या महिलेस, एक फोन आला, व फोन करणाराने, मी कुरिअर ऑफीसमधून बोलतोय, तुमच्या नावाने दुबईहून एक पार्सल आले असून, त्यात ८०० ग्रॅम ड्रग्जचे अंमली पदार्थ  सापडले आहेत. हा गुन्हा असल्यामुळे पोलिस तुम्हाला पकडतील. तुम्हाला यातून सहीसलामत सुटका करुन घ्यायची असेल तर तत्काळ अंधेरी येथील सायबर पोलिस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्याशी संपर्क करा, असे बोलून फोन करणाऱ्या व्यक्तीने त्या महिलेला एक मोबाईल नंबर दिला. यावर घाबरून जाऊन काळजीपोटी सदर महिलेने दिलेल्या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क केला. 

त्यांनी संपर्क साधताच मी सायबर शाखेतून पोलिस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलतोय असे सांगून त्या ठगाने महिलेचा विश्वास संपादन केला. यासाठी त्याच्याकडून फेक मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला. महिलेस खात्री पटावी म्हणून फसवणूक करणाऱ्या ठगाने मोबाईल नंबरसाठी ट्रूकॉलरला मुंबई सायबर क्राईम डिपार्टमेंट असे नाव नोंदवले होते. तसेच महिलेस ज्या स्काईप अॅपवरून फोन करण्यात येत होता, त्यावरही मुबई पोलीस डिपार्टमेंट असा असलेला लोगो लावण्यात आला होता. या नावाने फोन आल्यामुळे समोरची व्यक्ती पोलिसच आहे, असा महिलेचा समज होऊन यावर त्यांचा लगेचच विश्वास बसला.

त्यावर त्या ठगाने, या प्रकरणाचा आम्ही अधिक तपास करत आहोत. या प्रकरणात तुमचे बँक खाते सील केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यावरील पैसे तुम्ही दुसऱ्या खात्यावर वळते करा. चौकशी पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे पैसे मिळतील, असे सांगितले. 

त्यामुळे फिर्यादी महिलेने घाबरून आपल्या खात्यातील २० लाख रुपये त्या खात्यांत वळते केले. त्यानंतर त्यांच्याकडील बाकीचे पैसेही याच खात्यावर वळते केले. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या सदर दोन अज्ञात व्यक्तींनी त्या महिलेकडून ९१ लाख, ९४ हजार १३० रुपये बँक खात्यात वळते करुन घेतले. 

हा प्रकार २ एप्रिल ते ४ एप्रिल २०२३ दरम्यान घडला. त्यानंतर या दोघांचेही मोबाईल नंबर स्विच ऑफ येऊ लागल्यामुळे, आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शिवाजी नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल पाटील, सायबर पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)