बार्शी विशेष : गुरुवार दि. ३० मार्च २०२३ रोजी बार्शी कुर्डुवाडी रोडवरील शेंद्री फाट्याजवळ टेंपो व दुचाकीची धडक होऊन, दुचाकीवरील दोघे ठार झाले. या घटनेबाबत दीपक शंकर वीर (वय ४६) सध्या रा. आगळगांव, ता. बार्शी (मूळ रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दीपक वीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी गुरुवार दि. ३० मार्च २०२३ रोजी लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर येथील माझ्या बहिणीची भेट घेऊन माझ्या दुचाकीवरुन बार्शीकडे येत येत होतो. दुपारी ३.३० चे सुमारास बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावरील शेंद्री फाट्याजवळ दोघेजण असलेली एक मोटरसायकल (क्र.एमएच-१३-सीए-१३५०) मला ओव्हरटेक करुन पुढे गेलेली दिसली.
मला ओव्हरटेक करुन पुढे गेलेल्या मोटरसायकलचे समोर चालत असलेला आयशर टेंपो (क्र.एमएच-१४-सीपी-६३५२) इशारा न देता उजव्या बाजूस वळून रस्त्यावर बार्शीकडे तोंड करुन उभा राहिल्याने माझ्या पुढे गेलेल्या मोटरसायकलची टेंपोला धडक लागली, व मोटरसायकल वरील दोघेही रोडच्या साईडपट्टीवर पडले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होत होता. तेथे बरेच लोक जमा झाले होते, त्यापैकी कुणीतरी १०८ नंबरला कॉल करुन अॅम्ब्युलन्स बोलवली.
जमलेल्या लोकांपैकी काही जणांनी जखमीच्या खिशातील मोबाईल काढून शेवट कॉल केलेल्या नंबरवर फोन करुन झालेला प्रकार सांगितला, त्यावेळी मोटरसायकल चालवणारा मधुसूदन मुरलीधर जाधव व मागे बसलेला ऋषीकेश संतोष जाधव (दोघे रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) अशी त्यांची नावे समजली. काही वेळात अॅम्ब्युलन्स येवून त्यातील डॉक्टरांनी दोघांना तपासून ते जागेवरच मयत झाल्याचे सांगितले.
दीपक वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, टेंपोचालक किशोर माणिक भुसारे, रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी याच्याविरुध्द बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
