बार्शी विशेष : सूर्योदयाच्या वेळेनुसार द्वादशी तिथीची वृद्धि होत असल्याने सोलापूरचे पंचागकर्ते दाते यांनी देशातील कोणत्या भागात कामदा एकादशी १ व २ एप्रिल रोजी आहे व कोणत्या भागात महावीर जयंती ३ व ४ एप्रिल रोजी आहे, याचा खुलासा पंचागातील पृष्ठ क्रमांक ८८ वर नकाशासह केलेला आहे.
चैत्र शुक्ल कामदा एकादशी
पंचांगात दि. १ एप्रिल रोजी शनिवारी दिलेली आहे. दि. २ एप्रिल रोजी द्वादशी समाप्ति ३०:२५ आहे. ज्या गांवी २ एप्रिल रोजी सकाळी ६:२५ पूर्वी सूर्योदय होत असेल, तेथे द्वादशी तिथीची वृद्धि होत असल्याने स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशी असणार आहेत.
सोबतच्या नकाशात चैत्र शु. १२, रविवार दि. २ एप्रिल २०२३ ची सकाळी ६:२५ ची सूर्योदय रेषा दिलेली आहे. या रेषेच्या उजवीकडील प्रदेशात ६:२५ पूर्वी सूर्योदय होत असल्याने या प्रदेशात शनिवारी १ एप्रिल रोजी स्मार्त आणि रविवारी २ एप्रिल रोजी भागवत एकादशी असेल. मात्र रेषेच्या डावीकडील प्रदेशात १ एप्रिल रोजी शनिवारी सर्वांसाठी एकच एकादशी असेल.
शनिवारी १ एप्रिल रोजी एकच एकादशी
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, शिर्डी, मालेगांव, बारामती, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली सह संपूर्ण कोकण प्रदेश, संपूर्ण गोवा, संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांवी, गोकाक, कारवार, मंगळूरु, उडुपी, शिरसी, राजस्थानातील उदयपूर, जोधपूर, बिकानेर.
१ एप्रिल रोजी स्मार्त व २ एप्रिल रोजी भागवत एकादशी
महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूरसह अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगांव, जालना, संपूर्ण मराठवाडा व संपूर्ण विदर्भ, कर्नाटकातील हुबळी, धारवाड सह विजयपूर, कलबुर्गी, होसपेट, बागलकोट, गदग, हावेरी, मैसूर, बेंगळुरू, संपूर्ण मध्यप्रदेश, राजस्थानातील जयपूर, अजमेर, संपूर्ण हरियाणा व पंजाब.
महावीर जयंती २ दिवस
पंचांगात दि. ३ एप्रिल रोजी सोमवारी महावीर जयंती दिलेली आहे. चैत्र शु. त्रयोदशीचे दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते. त्रयोदशी अहोरात्र असल्यास अहोरात्राचे दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते. २ एप्रिल रोजी द्वादशी समाप्ति ३०:२५ म्हणजे ३ एप्रिलचे ६:२५ असल्याने महाराष्ट्रात काही प्रदेशात त्रयोदशीची वृद्धि होत आहे.
सोबतच्या नकाशात २ एप्रिल २०२३ रोजीची द्वादशी समाप्तीची (सकाळी ६:२५ ची) सूर्योदय रेषा दिलेली आहे. या रेषेच्या उजवीकडील गावांत ६:२५ पूर्वी सूर्योदय होत असलेल्या प्रदेशात द्वादशी तिथीची वृध्दी होत असून सोमवारी सूर्योदयानंतर द्वादशी तिथी संपते आहे. म्हणून या प्रदेशात दि. ४ एप्रिल रोजी मंगळवारी त्रयोदशीचे दिवशी महावीर जयंती आहे. मात्र रेषेच्या डावीकडील प्रदेशात दि. ३ एप्रिल रोजी सोमवारी त्रयोदशी अहोरात्र असल्याने या प्रदेशात महावीर जयंती दि. ३ एप्रिल रोजी आहे.
सोमवार ३ एप्रिल रोजी महावीर जयंती
मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, शिर्डी, मालेगांव, बारामती, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण कोकण प्रदेश, संपूर्ण गोवा, संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांवी, गोकाक, कारवार, मंगळूरु, उडुपी, शिरसी, राजस्थानातील उदयपूर, जोधपूर, बिकानेर.
मंगळवार ४ एप्रिल रोजी महावीर जयंती
महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ कर्नाटकातील हुबळी, धारवाडसह विजयपूर, कलबुर्गी, होसपेट, बागलकोट, गदग, हावेरी, मैसूर, बेंगळूरु, संपूर्ण मध्यप्रदेश, राजस्थानातील जयपूर, अजमेर, संपूर्ण हरियाणा व पंजाब.
