दीड हजार रुपये रिफंड मिळवण्याच्या मोहापायी तीन लाख रुपये गमावले

Admin
0

 

Three lakh rupees were lost in the temptation of getting a refund of one and a half thousand rupees

बार्शी विशेष : दीड हजार रुपये रिफंड मिळविण्याच्या मोहापायी तीन लाख रुपये गमवावे लागण्याची वेळ शेअर मार्केटींग करणाऱ्या युवकावर आल्याची धक्कादायक घटना घडली. या युवकाने २४०० फी भरुन शेअरमार्केटच्या ऑनलाईन क्लासला प्रवेश घेतल्यानंतर, व्हॉटस्अप ग्रुपवर अॅड करण्यासाठी १९६० रुपये फी भरावी लागेल व त्यापैकी १५०० रुपये परत मिळतील, असे सांगून, रिफंड मिळण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या रक्कमा भरायला लावून अज्ञात सायबर भामट्याने तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वैराग पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

रविंद्र वसंत सातपुते (वय ३२) रा. जामगांव (पा) ता. बार्शी यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मी स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे, तसेच शेअरमार्केटींग करत असल्यामुळे, युट्यूबवरील 'बाप ऑफ चार्ट' नावाचे चॅनेल बघत असताना त्यांच्या अॅपवर ऑनलाईन क्लास घेतले जात असल्याचे मला समजले, म्हणून मी ते अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन घेतले व त्यावरुन आलेल्या लिंकवरुन क्लासची फी २४०० रुपये भरली.

त्यानंतर ८६७०५२३८०३ या क्रमांकावरुन मला कॉल आला व त्यांच्या व्हॉटस्अप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर १९६० रुपये फी भरावी लागेल, ती भरल्यानंतर १५०० रुपये परत मिळतील असे सांगितले. त्याप्रमाणे मी १९६०रुपये भरले व थोडा वेळ वाट बघून, १५०० रुपये रिफंड आले नसल्याचे मी त्यांना सांगितले. तेव्हा १९०७ रुपये पाठवायचे होते, तुम्ही १९६० पाठविल्यामुळे रिफंड आले नाहीत. आता तुम्हाला परत २००० पाठवावे लागतील तेव्हा तुमचे सर्व पैसे रिफंड होतील असे सांगितले.

त्यानंतर प्रत्येक वेळी पैसे पाठिल्यावर, अजून अमूक रक्कम भरल्यावरच रिफंड होईल असे आमिष दाखवत, सातपुते यांना त्या भामट्याने २०००, १४६०, १०३८०, १९,९९९, ३९,९९९, ५५,०००, ५०,०००, ४०,०००, ३०,०००, ४५,०००, १४,९९९ अशा प्रकारे वेगवेगळ्या रक्कमा भरण्यास सांगितल्या. 

त्याच्या सांगण्यानुसार सातपुते यांनी वारंवार पैसे भरुनही त्यांना रक्कम रिफंड न मिळाली नाही, तसेच त्यानंतर कॉल करण्याचा प्रयत्न केलावर त्याचा मोबाईल स्वीच ऑफ येऊ लागल्यामुळे फसवणूक झाल्याची त्यांची खात्री पटली. एकूण ३,१४,०५२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यावरुन, वैराग पोलिस ठाण्यात ८६७०५२३८०३ या क्रमांकाच्या मोबाईल धारकाविरोधात (पत्ता माहित नाही) भा.दं.वि. १८६० कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ कलम ६६ क व ६६ ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना दि. ७ मार्च २०२३ रोजी सकाळी ७ ते दि. ९ मार्च दुपारी १२ चे दरम्यान घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)