बार्शी विशेष : इंदापूर येथून कत्तलीसाठी धाराशिवकडे नेण्यात येत असलेला, गोवंशाची २८ जनावरे भरलेला पिकअप पकडून, वैराग पोलिसांनी त्यातील जनावरांची सुटका केली. पोलिसांनी ही कामगिरी ६ मार्चच्या रात्री पार पाडली.
रातंजन येथील बस स्थानकावर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे पिकअप वाहन थांबले असल्याची बातमी वैराग पोलिसांना मिळताच, तेथे पोहोचलेल्या पोलिस पथकाने चालकाकडे चौकशी करुन पिकअपची (क्र. एमएच-११-टी-२४७०) पाहणी केली असता, त्यामध्ये २ जर्सी गाई व २६ लहान वासरे कोंबून, त्यांना वेदना होईल अशा अरूंद जागेत, हालचाल करता येणार नाही अशा पध्दतीने, तसेच त्यांच्या चारापाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नाही अशा पध्दतीने अमानुषपणे, निर्दयीपणे कोंबून भरलेली दिसली.
सदरची जनावरे कत्तलीसाठी धाराशिवकडे घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले. सदर वाहन पोलिस मित्र व रातंजन येथील स्थानिक व्यक्तींच्या सहाय्याने वैराग पोलिस ठाण्यात आणून, त्यामधील जनावरांची सोलापूरच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली.
पोकॉ ब्रम्हदेव वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन अन्वर सलाउद्दीन शेख (वय २३) रा. लुमेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
