बार्शी विशेष : तू आमच्या विरुध्द पोलिसात अत्याचाराची तक्रार का दिलीस म्हणून दोन तरुणांनी अत्याचार पीडीत मुलीवर सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील एका गावात घडली. या हल्ल्यात पीडीत मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
बार्शी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या या पीडीत मुलीची सध्या १२ वी ची परिक्षा सुरू आहे. दि. ५ मार्च रोजी रात्री साडेनऊचे सुमारास, गावातील अक्षय विनायक माने व नामदेव सिद्धेश्वर दळवी या दोघांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याबाबत पीडीत मुलीने बार्शी शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. त्यानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. १८६० कलम ३७६, ३५४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
दि. ६ मार्च रोजी पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी बोलविले असल्यामुळे, मुलीचे पालक तिला घरी ठेवून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गेले होते. तिचे पालक बार्शी शहर पोलिस ठाण्यात असताना, सायंकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने त्यांना फोन करुन सांगितले की, पीडीतेला दोन तरुणांनी सत्तूर व कोयत्याने मारले आहे, तुम्ही लवकर या.
तिचे पालक तातडीने घरी गेले तेव्हा, मुलगी गंभीर जखमी अवस्थेत बेशुध्द पडलेली दिसली. तिच्या डोक्यात, कपाळावर, हातावर जखमा झालेल्या होत्या, तसेच उजव्या हाताच्या बोटावर कापीव जखमा होऊन रक्त येत होते, दोन बोटे तुटलेले दिसले. त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने तिला अँब्युलन्समधून बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, त्या दोन तरुणांविरुध्द बार्शी तालुका पोलिस ठाण्यात आणखी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
