बार्शी विशेष : तुला लय माज आलाय, तू आम्हाला मागे शिव्या का देतो म्हणून काठी व कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील तडवळे (या) गावात घडली. याबद्दलची फिर्याद श्रीकांत अंबादास पाटेकर (वय ४९) रा. तडवळे (या), ता. बार्शी यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादी दि. २२ मार्च २०२३ रोजी दुपारी साडेबाराचे सुमारास गावातील मारुती मंदिरासमोरच्या कट्टयावर मुलगा हनुमंतसह बसले असताना, गावातील शशांक अर्जुन आवारे, चंद्रकांत रावसाहेब लोखंडे, भाऊसाहेब दत्तात्रय लोखंडे, बाबासाहेब दिनानाथ लोखंडे, अमरसिंह सुभाष लोखंडे, संदीप सुरेश बोडके (सर्व रा. तडवळे (या) ) व इतर चारजणांनी तेथे येऊन तुला लय माज आलाय, तू आम्हाला मागे शिव्या का देतो म्हणाले. तेव्हा मी तुम्हाला शिव्या दिल्या नाहीत असे फिर्यादीने म्हणताच काठीने मारहाण सुरु केली. त्यावेळी मुलगा हनुमंत भांडण सोडविण्यास मध्ये आला असता, त्याच्या हातावर कुऱ्हाडीने मारुन जखमी केले. तसेच दोघांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादीच्या शर्टच्या खिशातून एक हजार रुपये काढून घेतले.
श्रीकांत पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दहा जणांविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
