मुकणे यांच्या घरावर हल्ला करणारे आरोपी आठ तासात जेरबंद

Admin
0

 

Home Attack Accused Arrested Within 8 Hours; Performance of Barshi City Police

बार्शी विशेष : बार्शीतील राजेश मुकणे यांच्या घरावर दि. १ मार्च रोजी झालेल्या हल्ल्यातील दहा आरोपींना आठ तासात जेरबंद करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपींना दि. २ मार्च रोजी अटक करून, न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, दि. १ मार्च रोजी फिर्यादी राजेश चंद्रसेन मुकणे (वय ५०) रा. इंदिरानगर, कासारवाडी रोड, बार्शी हे  दुपारी ४.३० चे सुमारास घरासमोरील झाडांना पाणी घालत असताना, त्यांचे शेजारी राहणाऱ्या विठ्ठल शिंदे यांच्याशी भांडण झाले. त्यावेळी शिंदे यांनी राजेश मुकणे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला, तसेच त्यांची पत्नी व मुलालाही मारहाण केली. 

भांडण सोडविण्यास आलेल्या मुकणे यांच्या घरातील कामवालीला लोखंडी रॉडने, आणि मुकणेंच्या घराशेजारील महिलेला लाकडी बॅटने मारहाण केली. त्यामुळे ते सगळे उपचार घेण्यासाठी डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये गेले. 

त्यावेळी विठ्ठल शिंदे आणि त्यांच्या भावाने चिथावणी दिल्यावरून, त्यांचे जाधववाडी व इंदापूर येथील नातेवाईक रात्री ९ च्या सुमारास बार्शीत आले, व मुकणेंच्या घरात  घुसून राजेश मुकणे यास आज सोडायचे नाही असे ओरडत, त्यांच्या घरातील किंमती चीजवस्तू आणि घरासमोरील दोन कारची तोडफोड करून, कपाटातील २५ हजार रूपये रोख रक्कम घेवून, विरोध करणाऱ्या घरातील लोकांना लाकडी दांडक्याने व फावड्याच्या दांडक्याने जबर मारहाण करून ४ लाख ३ हजार रुपयांचे नुकसान केले. 

याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, सपोनि तोरडमल व सपोनि उदार यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या दोन पथकांनी, आरोपींची माहिती काढून आठ तासामध्येच दहा आरोपींना, जाधववाडी (ता. माढा) व इंदापूर (जि. पुणे) येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

सदरची कामगिरी पो. अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पो. अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पो. अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली, पो. नि. अण्णासाहेब मांजरे, सपोनि एस. ए. तोरडमल, सपोनि डी. डी. उदार, सपोफौ अजित वरपे, रेवण्णनाथ भोंग, चौगुले, मनिष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, अविनाश पवार, अर्जुन गोसावी, सचिन देशमुख, अंकुश जाधव, लगदिवे, अविरात बरबडे, रामेश्वर मस्के, सायबर पोलीस ठाण्याचे रतन जाधवर यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)