बार्शीत राजेश मुकणे यांच्या घरावर गुंडांचा सशस्त्र हल्ला

Admin
0

 

Armed attack by rowdy on the house of Rajesh Mukne in Barshi, along with valuables, two cars vandalized, women of the house also beaten up

घरातील किंमती वस्तूंसह, दोन कारची तोडफोड, घरातील महिलांनाही मारहाण 

कासारवाडी रोड भागातील इंदिरा नगर भागातील प्रकार

बार्शी विशेष : घरावर झालेल्या सशस्त्र हल्ल्याची फिर्याद राजेश मुकणे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार विठ्ठल शिंदे, रेखा शिंदे, शिवाजी शिंदे व इतर  ७ ते ८ अनोळखी इसमांविरोधात भा.दं.वि. १८६० कलम १०९,३२४,३२६,३९७,४२७,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची आधीची सविस्तर बातमी :

बार्शीत दोन शेजाऱ्यांच्या झालेल्या भांडणाचे पर्यावसान नंतर सशस्त्र हल्ल्यात होवून यात एका ऍग्रो कंपनीच्या मालकाच्या घरावर दोन वाहनातून आलेल्या ८ ते १० गुंडांनी सशस्त्र हल्ला करून दहशत माजवून घरातील किमती वस्तूंची, महागड्या चारचाकी दोन गाड्यांची तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली. बार्शी शहरातील कासारवाडी रोड वर इंदिरा नगर भागात रात्री ८.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. यात मुकणे यांच्या घरातील दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. 

इंदिरानगर भागात राजेश मुकणे व विठ्ठल शिंदे हे शेजारी राहतात. मागील आठवड्यात शिंदे मुकणे यांच्यात रस्त्यावरील झाडांच्या व गटार करण्याच्या कामावरून किरकोळ भांडणे झाली होती. अशा पार्श्वभूमीवर बुधवार दि १ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास या दोन शेजारी कुटुंबात भांडणे होवून त्यात शिंदे कुटुंबियांनी मुकणे यांना मारहाण केली. त्यानंतर जखमी मुकणे हे उपचारासाठी दवाखान्यात गेल्यानंतर रात्री मुकणे यांच्या घरी त्यांच्या आई, बहीण, मुलगी व कामवाली बाई अशा चौघी जणी असताना रात्री ८.३० च्या सुमारास दोन चारचाकी वाहनातून आलेले ८ ते १० गुंड कोयता, कुऱ्हाड, लाकडी स्टीक, रॉड आदी धारदार शस्त्रांसह राजेश मुकणे यांच्या घरात घुसले घरातील टीव्ही फ्रिज व इतर किमती वस्तू फोडून त्यांनी घरातील मुकणे यांच्या बहीण व मोलकरीण यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांची बहीण व कामवाली बाई या गंभीर जखमी झाल्या आहेत. अनेक किमती वस्तू गायब असल्याचे बोलले जात आहे. काचेच्या वस्तूंची तोडफोडमुळे तसेच दोन महागड्या कारच्या काचा फोडल्याने घरात व अंगणात सर्वत्र काचांचा खच पडला होता. हल्ल्यानंतर गुंड आलेल्या वाहनातून पसार झाले. 

पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सपोनि ज्ञानेश्वर उदार, शिवाजी जयपत्रे, महारुद्र परजने, पीएसआय प्रवीण शिरसट, कर्नेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मोठा पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता. दरम्यान, बार्शी शहर पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)