बार्शी विशेष (नारीवाडी) : शेत कुळवून घेण्यासाठी बोलविलेल्या ट्रॅक्टरचे चाक पायावरुन गेल्यामुळे पाय फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथे घडला.
सौदागर गणपत शिंदे (वय ४३) रा. नारीवाडी, ता. बार्शी हे त्यांच्या शेताच्या कडेला असलेल्या रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी त्यांचे शेत कुळवून घेण्यासाठी बोलविलेला ट्रॅक्टर हेड (क्र.एमएच-१३-बीएक्स-८५४३) इंदापूर कडून तेथे आला. चालकाशी बोलणे झाल्यानंतर त्याने निष्काळजीपणे व लक्ष न देता ट्रॅक्टर हेड रिव्हर्स गिअरमध्ये पाठीमागे घेतला, त्यामुळे धक्का लागून सौदागर शिंदे खाली पडले व ट्रॅक्टर हेडचे मागील चाक त्यांच्या डाव्या पायावरुन गेले. यामध्ये त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. चालक बालाजी दराडे व भाचा सुरज कापसे यांनी त्यांना धाराशिव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना दि. १२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडेपाचचे सुमारास घडली.
सौदागर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर हेड चालक बालाजी पंडित दराडे, रा. इंदापूर, ता. बार्शी यांचे विरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
