बार्शी विशेष : बार्शी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील मिळकतदारांना घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी भरणेबाबत देयके वाटप करून वर्ष होत आले, तसेच जप्तीचे वॉरंट देऊनही कर भरणा न केल्याने नगरपरिषदेने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर जप्तीची कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्याच अनुषंगाने शहरातील एका थकबाकीदार मिळकतदाराचे घर सील केले आहे. या पुढील काळात थकबाकी वसुलीसाठी नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेणार असल्याचा इशारा नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.
बार्शी नगरपरिषदेच्या वतीने बार्शी शहरातील मिळकतदारांना घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरणेबाबत देयके वाटप करण्यात आलेली आहेत. सदरची मागणी देयके मे व जून २०२२ मध्ये देण्यात येऊन सुध्दा अद्यापर्यंत ब-याच थकबाकीदारांनी नगरपरिषदेकडे कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे सन १९६५ च्या महाराष्ट्र म्युनिपलिटीज अॅक्ट कलम १५२ अन्वये जप्तीचे वॉरंट बजावण्यात आलेले आहे. सदरचे जप्तीचे वॉरंट बजावून देखील कराचा भरणा न केल्यामुळे शुक्रवार दि. ३ मार्च रोजी न.प.चे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण तसेच उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे, करनिरिक्षक भगवान बोकेफोडे यांचे मार्गदर्शनानुसार जप्तीची कार्यवाही करवसुली प्रभाग कर्मचाऱ्यांनी चालू केलेली आहे.
प्रभाग क्र. १० मधील सोमवार पेठ येथील श्रीधर अनंत व यशवंत शंकर कुलकर्णी यांची थकबाकी असल्यामुळे प्रॉपर्टी सिल केलेली आहे. तसेच थकबाकीदारांच्या मिळकती जप्तीची कार्यवाही चालू केलेली आहे. यापुढे थकबाकीदारांचे नळ तोडणेची कार्यवाही हाती घेतली आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपल्याकडील थकबाकीची रक्कम त्वरीत भरुन नगरपरिषदेची कार्यवाही टाळावी असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
