बार्शी विशेष : काळ बदलत आहे त्याप्रमाणे पत्रकारितेचे स्वरूपही बदलले आहे, डिजिटल मिडियाच्या पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून बातमी मागील वेगळेपणा देण्याचा प्रयत्न करावा. डिजिटल मिडियामुळे ज्ञान, माहिती व मनोरंजन क्षेत्रात क्रांती झाली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, येत्या काळामध्ये डिजिटल मिडिया पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना व मानवता संयुक्त संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या दोन वर्षांपूर्वी डिजिटल मिडियाच्या पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. पत्रकारांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या याशिवाय डिजिटल मिडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना एकसंघ बांधण्याचे काम ही संघटना करते. डिजिटल मिडियाचा कायदा करण्यासाठी देशभरात आपली संघटना रोल मॉडेल ठरेल. डिजिटल मिडियाच्या पहिल्या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील तब्बल दीड हजार पेक्षा जास्त पत्रकारांनी हजेरी लावली होती. डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मची नोंदणी, ओळखपत्र यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा चालू असल्याचे डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी यावेळी बोलताना सांगितले.
डिजिटल मिडियाच्या उत्क्रांतीमुळे सहजासहजी माहितीचे स्रोत उपलब्ध झाले आहेत. पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातही चांगली मैत्री होऊ शकते, याच माध्यमातून बीडमध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना कोरोना काळात वेगवेगळे उपक्रम राबवल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
ऑनलाईनच्या काळात सोशल मिडियामुळे प्रत्येक जण पत्रकार बनला आहे. खरे-खोटे ठरवायला जनतेकडे वेळ नाही. त्यामुळे पत्रकारांची सर्वाधिक गरज येणार्या काळात वाढत जाणार आहे. येणार्या काळात माध्यमे बदलत राहतील, मात्र बातमी सांगणारा कायम राहणार असून ते काम पत्रकारांनी प्रामाणिकपणे करावे, असे आवाहन वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांनी केले.
मानवता संयुक्त संघाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम ही संघटना करते, असे मानवता संयुक्त संघाचे संघटनमंत्री डॉ. विजयकुमार केसकर म्हणाले. डिजिटल मिडिया पत्रकारांसाठी राजा माने यांनी सुरू केलेली चळवळ निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रसंशोद्गारही त्यांनी काढले.
पत्रकारांचा हा सन्मान सोहळा, मानवता संयुक्त संघाचे जिल्हाध्यक्ष तथा डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघाचे उपाध्यक्ष विजय कोरे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शहराध्यक्ष प्रशांत कटारे, मानवता संयुक्त संघाचे उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
