बार्शी विशेष : मुख्यमंत्र्याच्या वर्षा शासकीय निवासस्थानी १२२ दिवसात २ कोटी ३८ लाख रुपये इतका खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. दिवसाप्रमाणे हिशोब केल्यास हा खर्च प्रतिदिन १ लाख ९५ हजार रुपये इतका आहे.
वर्षा शासकीय निवासस्थानी येणाऱ्या अतिथी, महत्वाच्या व्यक्तींकरीता खानपान सेवेसाठी दि. १ जुलै २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत २,३८,३४,९५८ रुपये खर्च करण्यात आले. (१२२ दिवस म्हणजे सुमारे १ लाख ९५ हजार प्रतिदिन )
सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृह भाडे, नास्ता, चहा, कॉफी यासाठी दि. ९ ऑगस्ट २०२२ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ९१,५०० रुपये खर्च करण्यात आले. (७ दिवस म्हणजे सुमारे १३ हजार प्रतिदिन )
मुख्यमंत्र्यानी आयोजित केलेल्या बैठकीवेळी तसेच त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी आलेल्या महत्वाच्या व्यक्ती व इतर अधिकारी यांच्या आदर सत्कारासाठी मंत्रालय उपहारगृहातून पुरविण्यात आलेल्या चहा, कॉफी, थंडपेयासाठी दि. २२ जून २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत ३,४९,९२९ रुपये खर्च करण्यात आले. (१०० दिवस म्हणजे सुमारे साडेतीन हजार प्रतिदिन )
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांना माहिती अधिकारात ही आकडेवारी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागकडून प्राप्त झाली आहे. तसेच अर्जात मागितलेल्या विमान खर्च, विदेश निवास खर्च, परराज्य निवास खर्च व जाहिरात खर्च याबाबतच्या माहितीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे स्वतंत्रपणे अर्ज करण्यास सूचित केले आहे.
वेळेवर पगार होत नसल्यामुळे आर्थिक विवंचनेतून कवठे महंकाळ आगारातील भीमराव सूर्यवंशी या एसटी चालकाने दोनच दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी खानपान सेवेसाठी १ लाख ९५ हजार प्रतिदिन खर्च झाल्याची ही आकडेवारी बरेच काही सांगून जाते.


