बार्शी विशेष : मॉलमध्ये कामाला असलेल्या राजस्थानी कामगारांनीच सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे तयार कपडे लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची फिर्याद संकेत अशोक गुंदेचा (वय ३६) रा. मिरगणे कॉम्प्लेक्स, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
गुंदेचा यांचे अलीपूर रोडवरील रेणुका मंगल कार्यालय येथे मेगा मॉल नावाने कापडाचे दुकान असून, सदर मॉलमध्ये दि. १७ जानेवारी २०२३ पासून, हरीश गोदरा व देवेंद्रसिंग राजपुरोहित हे दोघे सेल्समन म्हणून व राकेश गोदरा, अनिल महेंद्रकुमार शर्मा (रा. घडसीसर, चुरू, राजस्थान), दिपककुमार आसोपा (रा. कालुबास, बिकानेर, राजस्थान), अनिलकुमार महेंद्र जाट (रा. घडसीसर, चुरू, राजस्थान), दिपक दडिच, महिपाल अमरराम तेतरवाल व अशोक ( पूर्ण नांव माहित नाही, सर्व रा. राजस्थान) हे सात कामगार असे एकूण नऊ लोक कामावर रुजू झाले.
त्यावेळी त्यांना आधार कार्डची मागणी केली असता, हरिश गोदरा याने आमचे आधारकार्ड गावी असून आमच्यापैकी कोणी तिकडे गेल्यावर आणून देतो, असे सांगून कामगारांपैकी अनिल शर्मा, दिपककुमार व अनिलकुमार जाट यांचे आधारकार्ड दिले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास बसल्यामुळे त्यांना कामावर ठेवून घेतले. ते सगळेजण मॉलमधील रूममध्ये राहात होते. विक्रीसाठी आलेल्या कपड्यांचा स्टॉक मॉलमधील एका शॉपमध्ये ठेवला जात होता.
दि. ३१ जानेवारी रोजी राकेश गोदरा व दिपक दडिच हे दोघे अचानक कामावरून न सांगता निघून गेले. त्याबाबत सेल्समन हरिश गोदरा व देवेंद्रसिंग राजपुरोहित यांना विचारले असता, ते दोन चार दिवसांनी परत कामावर येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दि. ४ फेब्रुवारी रोजी कामगार अनिल शर्मा हा पण कामावरून निघून गेला. दि. ८ फेब्रुवारी रोजी अनिल जाट संध्याकाळी बाहेर पडत असताना, सिक्युरीटी अलार्म वाजल्यामुळे त्याला अडवून तपासणी केली असता, तो दोन टीशर्ट लपवून रुममध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा महिपाल तेतरवाल हा सुध्दा सामिल असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी दिपककुमार आसोपा हा कामावरून निघून गेला.
राजस्थानी कामगारांचा संशय आल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना दि. ११ फेब्रुवारी रोजी सेल्समन हरीश गोदरा व देवेंद्रसिंग राजपुरोहित व कामगार अशोक हे कामावरून निघून गेले. सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीत मॉलच्या उत्तरेकडील शॉपमधून देवेंद्रसिंग राजपुरोहित हा शॉपमधील मालाची पोती भरून घेऊन जात असलेला दिसून आला.
मालाचा स्टॉक चेक करण्यासाठी शॉपीचे कुलूप उघडण्यास गेल्यावर कुलूप बदलेले दिसले. त्यावेळी मॉलचे व्यवस्थापक, कामगार तसेच जागा मालक यांचेसमक्ष कुलूप तोडून तपासणी केली असता, ६३,५१२ रुपये किंमतीचे ६८ शर्ट, ६२,३७९ रुपये किंमतीचे ९५ टीशर्ट, २३,०३९ रुपये किंमतीच्या जीन्स पँट असा एकूण १,४८,९३० रुपये किंमतीचा माल चोरीला गेल्याचे दिसून आले.
दि. १७ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या चोरीची फिर्याद गुंदेचा यांनी दिल्यावरून, बार्शी शहर पोलिस ठाण्यात, नऊ इसमांविरोधात भा.दं.वि. १८६० कलम ३४, ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
