बार्शी विशेष : लोकांमध्ये दहशत माजविण्याच्या हेतूने कोयता घेऊन फिरणाऱ्या तीन तरूणांपैकी दोघांना पकडण्यात बार्शी शहर पोलिसांना यश मिळाले आहे.
दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री तीन इसम मोटरसायकलवरून हत्यार घेऊन फिरत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिस शिवाजी कॉलेजच्या गेटसमोर गेले तेव्हा, एका मोटरसायकलवर तिघेजण संशयास्पदरित्या फिरताना दिसले. त्यांना थांबवून पोलिस चौकशी करत असताना, त्यांच्यापैकी एकजण त्याचेकडील कोयता खाली टाकून पळून गेला.
शाम दिलीप कदम (वय २१) रा. राऊत चाळ, बार्शी व आदित्य भानुदास भोसले (वय २१) रा. मांगडे चाळ, बार्शी अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. तर विठ्ठल नवनाथ कदम रा. राऊत चाळ, बार्शी असे पळून गेलेल्या व्यकिचे नाव असल्याचे त्या दोघांनी पोलिसांना सांगितले.
त्यांच्याकडून दोन फूट लांब, दीड इंच रूंदीचा, लोखंडी मूठ असलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पोकॉ तेजस जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४,२५ व भा.दं.वि. १८६० कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
आत्तापर्यंत पुणे, नाशिक शहरात कोयता गँग दहशत माजवत असल्याचे बार्शीकरांना माहित होते. पण आता शांत असलेल्या निवांत बार्शीत कोयत्याची झालेली एंट्री बघता, बार्शीची सार्वजनिक शांतता बिघडणार तर नाही ना अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
