बार्शी विशेष : इथे का थांबला म्हणून बिअरची बाटली डोक्यात मारून जखमी केल्याची घटना बार्शी बायपास रोड येथे घडली. सचिन सुरेश शेंडगे (वय ३२) असे जखमी झालेल्या व्यक्तिचे नांव आहे. दि. ५ जानेवारी रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी कामानिमित्त जात असताना, धस पिंपळगांव रस्त्यावरील बायपास चौकाचे अलिकडे दुचाकी थांबवून लघुशंका करून दुचाकी जवळ येताच, तेथील मोकळ्या मैदानात बसलेले तीन युवक त्यांचेजवळ आले.
त्यापैकी एकाने तू इथे का थांबला असे विचारल्यावर, लघुशंकेसाठी थांबलो होतो, तुझ्या घरची जागा आहे का असे फिर्यादी म्हणताच, त्या युवकाने हातात असलेली बिअरची काचेची बाटली फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागे मारली, दुसऱ्या युवकाने दगड हातावर मारून जखमी केले, तर तिसऱ्या युवकाने ढकलून खाली पाडले. नंतर ते तिघेही मैदानात लावलेल्या दुचाकीवर बसून निघून गेले, अशी फिर्याद सचिन शेंडगे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
