तुच्छ मानसिकता | संपादकीय, बार्शी विशेष दि. ९ फेब्रुवारी २०२३

Admin
0

 

Inferior mentality | Editorial Barshi Vishesh 9 February 2023

तुच्छ मानसिकता

(संपादकीय, बार्शी विशेष दि. ९ फेब्रुवारी २०२३)

----------------------------------------------------------

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, यांच्या बातम्या गाडी चोरीला गेल्याच्या जास्त असतात असा संवाद एका ठिकाणी बोलताना कानी पडला. त्यामध्ये उपहासात्मक आणि तुच्छतेचा भाव होता. दुचाकी चोरीला गेल्याची बातमी तुच्छ असते, ही लोकांची मानसिकता कधी बदलणार ? 

'एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो बाबू ' असा हिंदी चित्रपटातील एक संवाद सर्वपरिचीत आहे. त्या संवादाप्रमाणेच ज्यांचे वाहन चोरीला गेलेले नाही, त्यांना वाहन चोरीला गेल्यानंतरच्या वेदनांची किंमत कशी समजणार ? असा प्रश्न आहे. 

सद्याच्या काळात दुचाकी वाहन अनेकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाले आहे. परिवारातील एखाद्या सदस्याएवढे त्याचे जीवनात स्थान आहे असे म्हणले तरी अतिशयोक्ती ठरू नये. नित्य व्यवहारात तर वाहनाची आवश्यकता अनेकांना पडतेच, त्याशिवाय अडीअडचणीच्या वेळी कुठेही, केव्हाही रात्री अपरात्री तेच वाहन उपयोगी येते. 

इतके सवयीचे झालेले वाहन  कुठे तरी उभे केलेले असताना किंवा एखाद्या सकाळी उठल्यानंतर घराबाहेरून चोरीला गेल्याचे समजल्यावर काय वेदना होत असतील, किती अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असेल याची कल्पना ज्याची त्यालाच येणार. वाहन चोरीला गेल्यानंतर नित्य व्यवहारात जाण्या येण्यासाठी शहर बस सेवा उपलब्ध नाही, रोज रिक्षाने जाणे येणे परवडत नाही, दररोज चालत जाणे त्यामुळे होणारा उशीर हे सर्वांना सहन आणि शक्य होईलच असे नाही. आणि सगळ्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असते असे नाही, त्यामुळे चोरी झाल्यानंतर पुन्हा दुसरे नविन किंवा वापरलेले वाहन घेण्यासाठी आर्थिक तजवीज करायची म्हणजे आकस्मिकपणे उद्भवलेल्या मोठ्या खर्चामुळे कित्येकांचे आर्थिक गणित पार बिघडून जाऊ शकते. 

दुचाकी वाहन चोरीला गेल्यावर ज्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते, तशी ती कुणावरही येऊ नये, पण दुचाकी वाहन चोरीच्या बातम्यांना तुच्छ समजणाऱ्यांचे वाहन जर दुर्दैवाने कधी चोरीला गेलेच तर त्यावेळी त्यांना त्याची किंमत समजून येईल.


रमण कारंजकर, संपादक, बार्शी विशेष

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)