A marriage bureau that shows dreams to those who want to get married
विवाहेच्छुकांना स्वप्ने दाखविणारी मंडळी
--------------------------------------------------------------
ग्रामिण भागातही शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण झाली. शिक्षण घेतलेल्या ग्रामिण भागातील मुलीसुध्दा नवरा शहरी भागातील असावा अशी अपेक्षा व्यक्त करू लागल्या. ग्रामिण भागातील मुलींना सुध्दा जर ग्रामिण भागातील नवरा नको असेल, तर शहरी भागातील मुली ग्रामिण भागात यायला कशा तयार होतील हा प्रश्न आहे.
----------------------------------------------------------------
रोजच्या रोज तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलमधून अगदी ग्रामीण भागापर्यंत सहजगत्या आणि झटपट पोहोचत आहेत. त्यामुळे चकाचक राहणीमान, गरज नसतानाही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवनविन वस्तूबद्दल निर्माण होत असलेले आकर्षण, आणि शेजाऱ्यांकडे, मित्राकडे दिसलेली वस्तू आपल्याही घरी आणण्याचा अट्टाहास यामुळे नविन पिढी चंगळवादी होत चालली आहे.
उच्च दर्जाचे राहणीमान आणि आधुनिक जीवनशैली याबद्दलच्या आकर्षणामुळे जीवन जगण्याबाबतच्या संकल्पनाही बदलत चालल्या आहेत. साहजिकच विवाहेच्छुक तरूण तरूणींचे विवाहाबद्दलचे विचार आणि भावी जोडीदाराकडूनच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. आणि त्यामुळे पूर्वीइतके सहजपणे विवाह जुळणे वरचेवर कठीण होत चालले आहे.
ग्रामिण भागातही शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण झाली. शिक्षण घेतलेल्या ग्रामिण भागातील मुलीसुध्दा नवरा शहरी भागातील असावा अशी अपेक्षा व्यक्त करू लागल्या. ग्रामिण भागातील मुलींना सुध्दा जर ग्रामिण भागातील नवरा नको असेल, तर शहरी भागातील मुली ग्रामिण भागात यायला कशा तयार होतील हा प्रश्न आहे.
यामुळे जेमतेम शिक्षण झालेल्या आणि ग्रामिण अथवा निमशहरी भागात छोटा मोठा व्यवसाय, उद्योग धंदा किंवा खासगी नोकरी करणाऱ्या मुलांची खरी पंचाईत होऊन बसली आहे. आम्हाला मुली नको म्हणत असतील तर आमची लग्ने कधी होणार हा त्यांचा आणि पालकांचा प्रश्न आहे.
बरे कोणत्या आई वडिलांना आपल्या मुलामुलींचे लग्न जमू नये असे वाटत असेल? ते जरी मुलामुलींना, वय वाढत चाललयं, जीवनात थोडी बहुत अँडजेस्टमेंट करावी लागते अशा पध्दतीच्या काही गोष्टी समजावून सांगत असले तरीही वयात आलेल्या बरोबरीच्या मुलामुलींवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करता येत नाही याची त्यांनाही जाण असते, त्यामुळे ती मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्या मर्जीनेच स्थळे बघण्याशिवाय हतबल आईबापाला पर्याय नसतो. शेवटी लग्नानंतर आयुष्य मुलामुलीला काढायचे असते, त्यामुळे त्यांची पसंती हीच अंतीम ठरते. पूर्वीच्या काळात घरातील जेष्ठ मंडळी सांगतील त्या स्थळाला होय म्हणायचे आणि लग्नाला उभे राहायचे दिवस केव्हाच इतिहास जमा झालेत.
परिणामी या समस्येमुळे विवाहेच्छुक विशेषतः तरूण आणि त्यांचे पालक चिंताग्रस्त आहेत. गरज ही शोधाची जननी असते या नियमानुसार नेमकी हीच समस्या हेरून समाजातील बरीच मंडळी या विवाह जुळवण्याच्या क्षेत्रात सक्रिय झाली आहेत. त्यापैकी काही व्यक्ती आणि संस्था प्रामाणिकपणे काम करत असतीलही, पण काही संधीसाधूंनी या संधीचा फायदा उचलून विवाहेच्छुक गरजूंना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे.
बार्शीमध्ये अलिकडे असाच एक फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला. नोंदणी नसलेल्या एका अनाधिकृत संस्थेच्या माध्यमातून काही लोकांनी, विवाहेच्छुक तरूण आणि त्यांच्या पालकांकडून वेगवेगळ्या शुल्काच्या नावांखाली हजारो रूपये घेऊन विवाह लावून देण्याचे प्रलोभन दाखवले. बरे झाले आपलेही लग्न होईल या आशेने शेकडो लोक त्यांना पैसे देऊन बळी पडले.
एका कार्यालयात बोलावलेल्या मेळाव्यात जमलेल्या लोकांना लग्न लावणे तर लांबच परंतु मुलीही दाखविल्या नाहीत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुढच्या तारखा सांगून चालढकल सुरू केली. त्यामुळे लोकांचा संशय अधिकच बळावला. याआधी फसवणूक होत असल्याची शंका येत होती त्याचे रूपांतर खात्रीत झाले. मग नंतर ते प्रकरण पोलिसांकडे गेले तो पुढील तपासाचा भाग वेगळा.
तसे पाहता समाजात यासारख्या फसवणूकीचे प्रकार याआधीही घडले आहेत आणि आत्ताही घडत आहेत, पण ते वैयक्तिक पातळीवर घडले असल्याने, त्याची फारशी वाच्यता झाली नाही आणि होत नाही. शिवाय याला बळी पडलेले लोक पैसे अक्कलखाते गेले अशी मनाची समजूत घालून गप्प बसतात. त्यामुळे फसवणूक करणारांचे अजूनच फावते.
शेवटी तात्पर्य काय की, हा फसवणूकीचा धंदा विवाहेच्छुक गरजवंत आहेत तोपर्यंत सुरू राहणार आहे यात शंका नाही, पण फसवणूक होऊ नये म्हणून कुणावर कितपत विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
- रमण कारंजकर, संपादक, बार्शी विशेष
