![]() |
बार्शी विशेष : एकटे राहणाऱ्या वृध्द महिलेच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून, कडी-कोयंडा काढून घरातील दागिने, मोबाईल आणि रोकड मिळून ४३ हजाराचा ऐवज चोरांनी लुटल्याची घटना कारी येथे घडली. भामाबाई शिवाजी उघडे (वय ७०) रा. कारी, ता. उस्मानाबाद यांनी पांगरी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा मुंबईत रहात असल्यामुळे, कारी येथील घरात त्या एकट्याच राहतात.
दि. ४ जानेवारीच्या रात्री जेवण करुन, गेटला कुलूप लाऊन तसेच घराच्या दाराची कडी लाऊन त्या झोपी गेल्या. रात्री अडीचच्या सुमारास गळ्याला काहीतरी स्पर्श झाल्यासारखा वाटल्यामुळे त्यांना जाग आली. तेव्हा गळ्यातील मण्याची पोत तुटलेली दिसली, उशाजवळ ठेवलेला मोबाईल दिसला नाही, घराचा दरवाजा उघडा दिसला. घरातील कपाट उघडे होते व त्यामधील सोन्याची अंगठी, चांदीचा घोडा व रोख रक्कम दिसली नाही.
त्यानंतर मोठ्याने ओरडल्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे बहिण मेहुणे तेथे आले. घडलेला प्रकार त्यांना सांगितल्यावर सर्वांनी मिळून पाहणी केली असता, गेटचे कुलूप तुटलेले दिसले आणि घराच्या कड्या काढलेल्या दिसून आल्या त्यावरुन चोरी झाल्याची खात्री झाली. एकूण ४३ हजार ८५० रुपये किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
