![]() |
बार्शी विशेष : तालुक्यातील चिंचोली-ढेंबरेवाडी, मालेगांव, सुर्डी, संगमनेर, रऊळगांव आदी साठवण तलाव मंजूर झाले होते. त्यापैकी चिंचोली-ढेंबरेवाडी साठवण तलाव वगळता बाकीच्या सर्व तलावाचे काम झाले आहे. काही तांत्रिक कारणामुळे चिंचोली ढेंबरेवाडी साठवण तलावाचे काम रखडले होते.
शनिवार दि. २१ जानेवारी रोजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासमवेत जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता दिलीप प्रक्षाळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी रामचंद्र क्षीरसागर, जलसंधारण अधिकारी सचिन किरनाळे व अन्य अधिकारी यांनी नियोजीत साठवण तलावाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या तलाव क्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांच्याशी विचार विनिमय, अडचण समजावून घेऊन शासन स्तरावरून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याची ग्वाही राऊत यांनी दिली. या तलावामुळे पांगरी व पंचक्रोशीतील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.
चिंचोली व ढेंबरेवाडी परिसरातील जनतेच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार साठवण तलावाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आ. राऊत यांचे शासन दरबारी प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच तलावाचे काम सुरू होणार आहे. बार्शी तालुक्यातील साठवण तलावांच्या कामासाठी आमदार राजेंद्र राऊत हे करत असलेल्या पाठपुरावा आणि प्रयत्नामुळे हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला तसेच चिंचोली व ढेंबरेवाडी तसेच आसपासच्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र राऊत यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी चिंचोली व ढेंबरेवाडी तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
