बार्शी विशेष : सोलापूरच्या गड्डा यात्रेस जाऊन येते म्हणून सांगून गेलेली मुलगी परतलीच नाही, तिला पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे.
अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली सासुरे येथील ही मुलगी, दि. २४ जानेवारी रोजी सोलापूर येथील गड्डा यात्रा बघण्यास जाऊन येते, असे आईला सांगून सकाळी १० च्या सुमारास बाहेर पडली. दुपारी चारच्या सुमारास घरी आलेल्या वडिलांना ती अजून परत आली नसल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी व तिच्या भावाने मोबाईलवरून तिच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन बंद लागत असल्याने संपर्क झाला नाही.
रात्रभर वाट पाहून दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी रोजी त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, तसेच २६ जानेवारी रोजी गड्डा यात्रेत जाऊन सगळीकडे शोध घेतला, तरीही त्यांना मुलगी मिळून आली नाही.
त्यामुळे कुणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लाऊन पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
