बार्शी विशेष : हत्या करण्यासाठी माढा येथून उस्मानाबादच्या कत्तलखान्याकडे चालवलेल्या गोवंशाच्या ३४ लहान वासरांची पिकअप वाहनातून वैराग पोलिसांनी मुक्तता केली. २७ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली.
पोकॉ शरद कांबळे यांनी याबाबतची फिर्याद वैराग पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी अब्दुल शकूर मुलाणी (वय २१) रा. शुक्रवार पेठ, माढा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवंश जातीची लहान वासरे घेऊन एक पिकअप माढ्याकडून आला असून तो उस्मानाबादकडे जाणार असल्याची बातमी रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोहेकॉ गवळी, पोकॉ शरद कांबळे, पोना पाडुळे वैराग शहरातील सूरज धनाजी माने, गणेश महादेव जाधव, शुभम संजय जाधव, सत्यवान सुधाकर ताटे, प्रसाद अरविंद जोशी यांना सोबत घेऊन मोहोळ चौकात थांबले.
मिळालेल्या बातमीप्रमाणे रात्री साडेदहाच्या सुमारास शिवाजी चौक, वैरागकडून पांढऱ्या रंगाचा पिकअप (क्र. एमएच-४५-टी-३९८४) येताना दिसला. त्याला थांबवून तपासणी केली असता, पिकअप मध्ये क्षमतेपेक्षा जास्त, दाटीवाटीने लहान वासरे कोंबून, त्यांना वेदना होईल अशा अरूंद जागेत, हालचाल करता येणार नाही अशा पध्दतीने, तसेच त्यांच्या चारापाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नाही अशा पध्दतीने अमानुषपणे, निर्दयीपणे वासरे कोंबून भरलेली दिसली. ती मोजून पाहिली असता ३४ वासरे मिळून आली. पोलिस कारवाईनंतर अंमलदारासोबत पिकअपसह वासरांना सोलापूर येथे जमा करण्यासाठी रवाना केले.
