बार्शी विशेष : इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील चोरीस गेलेल्या दोन लाखाच्या वस्तू पंधरा दिवसांत हस्तगत करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, बार्शीतील गवळे गल्ली येथे दिनेश येवनकर यांचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तसेच इन्व्हर्टर व त्यांस लागणाऱ्या बॅटऱ्या विक्रीचे दुकान आहे. दुकानातील अपुऱ्या जागेमुळे काही जादा वस्तू घरी ठेऊन तेथून ग्राहकांना देतात.
घरी ठेवलेल्या वस्तूंच्या साठ्याची नियमित तपासणी करताना ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंतच्या नोंदीनुसार घरी ठेवलेल्या वस्तूपैकी, ११ इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या, २२ इन्व्हर्टर व १ स्मार्ट टीव्ही अशा एकूण २ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या वस्तूंचा साठा प्रत्यक्षात कमी आढळून आला.
त्यामुळे मागील सहा महिन्यापासून दुकानात काम करणाऱ्या व घरातून ग्राहकांना वस्तू देणाऱ्या सचिन राजेंद्र शिंदे (वय ३०) रा. ढगे मळा, बार्शी यांस त्यांनी याबाबत विचारणा केली असता, मला माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो निघून गेला. त्याच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्याविषयी संशय येऊन त्याने या वस्तू चोरून नेल्या असाव्यात अशी फिर्याद दिनेश रमेश येवनकर यांनी १० जानेवारी रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली होती.
शहर पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास करून सचिन शिंदे यांस दि. २२ जानेवारी रोजी अटक करून ३० जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी घेतली. पोलीस कोठडी दरम्यान तपास करून त्यांचेकडून १ लाख ३२ हजार रूपये किमंतीच्या ११ ट्युब्यलर बॅट-या, ८४ हजार रूपये किमंतीचे १४ मायक्रोटेक इन्व्हर्टर व २१ हजार रूपये किमंतीचा १ स्मार्ट एलईडी टिव्ही असा एकुण २ लाख ३७हजार रूपये किंमतीचा माल हस्तगत केला.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, स.पो. नि. सुधीर तोरडमल, सपोफौ अजित वरपे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकॉ अंकुश जाधव, पोकॉ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ रविकांत लगदिवे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ सचिन देशमुख, पोकॉ अविनाश पवार यांनी केली.
