![]() |
बार्शी विशेष : बार्शीमध्ये बनावट कृषी निविष्ठा तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणी छापा मारून ७६ लाख रुपये किंमतीचा साठा पंचनामा करुन सील करण्याची कारवाई करण्यात आली. कृषी विभागाने बार्शी शहर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
बार्शीमध्ये बनावट कृषी निविष्ठा तयार करुन त्यांची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरुन, धनंजय दिनकर पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, सोलापूर यांनी, बार्शी शहरातील अलिपूर रोडवरच्या पाटील प्लॉटमधील बागवान निवास येडशीकर बंगल्यात कृषी विभाग, जीएसटी विभाग, पोलिस खात्यातील अधिकारी तसेच उत्पादन करणारे कंपनीचे मालक हनुमंत परमेश्वर चिकणे यांच्या उपस्थितीत तपासणी केली असता, सदर बंगल्यात दोन ड्रममध्ये रसायन मिश्रीत द्रावण, ५० मिली ते ५ लिटर क्षमतेच्या मोकळ्या बाटल्या, त्यावर चिकटविण्यासाठीचे लेबल, पॅकिंग साहित्य, विविध आकाराचे बॉक्स, बोरॉन झिंक, पोटॅशियम ह्युमेट, कॉपर सल्फेट नावे असलेल्या २५ किलो पावडरच्या १६ पिशव्या, विविध रसायनांनी भरलेले वेगवेगळे लेबल चिकटवलेले २८ ड्रम, तसेच चार रुममध्ये मॅन्यु.मार्केटेड बाय इकोमेक अॅग्रो प्रा. लि. डोंबिवली ईस्ट असे लेबल लावलेल्या ५० मिली ते ५ लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बाटल्या खोक्यात पॅक केलेल्या मिळून आल्या.
याबाबत उत्पादक हनुमंत चिकणे यांच्याकडे चौकशी केली असता, ते उत्पादन परवाना दाखवू शकले नाहीत. सदर ठिकाणी आढळून आलेला ७६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करुन सील करण्यात आला.
या कारवाईत तालुका कृषी अधिकारी बार्शी शहाजी कदम, पंचायत समिती बार्शी कृषी अधिकारी किशोर अंधारे, पोलिस अधिकारी, जीएसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
धनंजय दिनकर पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
