![]() |
बार्शी विशेष : पांगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि गजानन खुणे यांच्यासह अन्य दोघांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार व त्याचा भाऊ यांच्याविरुद्ध बार्शी तालुक्यातील पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. सदर गुन्ह्यात तक्रारदार व त्याच्या भावाला नाममात्र अटक करून जामिनावर सोडण्यासाठी, सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि गजानन खुणे व पोलिस शिपाई सुनील बोदगवाड यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. व ही लाचेची रक्कम कॅन्टीन चालक हसन इस्माईल सय्यद यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली असता, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून कॅन्टीन चालक इस्माईल सय्यद यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारली असता, सपोनि गजानन खुणे (वय ३५), पोलिस शिपाई सुनील बोदगवाड (वय ३१) व सहआरोपी चहा कॅन्टींन चालक हसन सय्यद (वय ५९) या तिघांनाही अटक केली.
सदर कारवाई एसीबी, पुणेचे पोलिस अधिक्षक अमित तांबे, अप्पर पोलिस अधिक्षक सूरज गुरव, सोलापूर एसीबीचे पोलिस उपअधिक्षक गणेश कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक व कर्मचारी शिरीषकुमार सोनवणे, प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, सलीम मुल्ला, गजानन किणगी, उडानशिव, शाम सुरवसे यांच्या पथकाने पार पाडली.
