![]() |
बार्शी विशेष : रस्त्यावरील खड्ड्यात मोटरसायकल आदळल्याने मागे बसलेल्या व्यक्तीचा खाली पडून मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना बार्शी तालुक्यातील मालवंडी गांवाजवळ घडली.
अण्णासाहेब नानासाहेब बोटे (रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी) हे त्यांच्यामागे बसलेले सर्जेराव उध्दव ढोरे (वय ३७) रा. यावली, ता. बार्शी यांना यावली येथे सोडविण्यासाठी मोटरसायकलवरुन निघाले होते.
बार्शी ते मालवंडी रस्त्यावरुन ते जात असताना मालवंडी गांवाजवळ आल्यानंतर रस्त्यावरील एका खड्ड्यामध्ये त्यांची मोटरसायकल आदळली. त्यावेळी मागे बसलेले सर्जेराव ढोरे खाली पडल्यामुळे त्यांचा डोक्यास मार बसून त्यांचा मृत्यु झाला. ही घटना दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाचे सुमारास घडली.
अण्णासाहेब बोटे यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, अविचाराने, हयगयीने भरधाव वेगात मोटरसायकल चालवून रस्त्यावरील खड्ड्यात आदळून, माझा भाऊ सर्जेराव ढोरे खाली पडण्यास कारण होवून, त्यांच्या डोक्यास गंभीर जखम करुन मयत होण्यास ते कारणीभूत झाले अशी तक्रार अशोक उध्दव ढोरे (वय ३०) रा. यावली यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.
