![]() |
बार्शी विशेष : चार महिन्यापूर्वीच विकत घेतलेले स्प्रिंकलर सेट व पाईप देवगांव (मा) येथून चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद सेवानिवृत्त प्राध्यापक चंद्रहंस बापूजी गंभीर (वय ७४) रा. शिवशक्ती बँकेजवळ, शिवाजी नगर, बार्शी यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.
गंभीर सरांनी त्यांच्या देवगांव (मा) येथे असलेल्या शेतासाठी चार महिन्यापूर्वीच विकत घेतलेले जैन कंपनीचे स्प्रिंकलर सेट व पाईप शेतातील खोलीत ठेवलेले होते. सदर शेताला पूर्ण कंपाऊंड असून लोखंडी गेटला कुलूप लावलेले असते.
दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी त्यांची शेती बटईने करणारे सूरज प्रदीप पाटील (रा. शिरसाव, ता. परांडा) यांनी सरांना फोन करुन सांगितले की, काल रात्री साडेआठ पर्यंत मी शेतात होतो व त्यावेळेपर्यंत तेथे असलेले स्प्रिंकलर सेट व पाईप आज दिसून येत नाही, आणि गेटला लावलेले कुलूपही तुटलेले आहे.
त्यामुळे गंभीर सरांनी शेतात जाऊन पाहणी करुन शोध घेतला परंतु स्प्रिंकलर सेट व पाईप मिळून आले नाही. त्यामुळे दि. १४ डिसेंबरच्या रात्री साडेआठ ते १५ डिसेंबरच्या सकाळी नऊचे दरम्यान सदर साहित्य चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.
