![]() |
बार्शी विशेष : बार्शी शहरातून हैद्राबाद स्थित (CRPF Rapid Action Force 99 battalion) रॅपिड अॅक्शन फोर्स 99 बटालियनने पथसंचलन केले. राजकीय, धार्मिक, जातीय कारणांवरुन शहरात व तालुक्यात पूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे बार्शी शहर व तालुक्याची संवेदनशील म्हणून ओळख आहे. या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन करण्यात आले.
याबाबत माहिती देताना बार्शीचे विभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल म्हणाले की, केंद्र सरकारकडून पूर्वी घडलेल्या दंगलींची माहिती संकलित करण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ही तुकडी येथे आलेली असून, ती पथसंचलन करणार आहे. त्याचा फायदा आपल्याला भविष्य काळातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर होणार आहे.
रॅपिड अॅक्शन फोर्स 99 बटालियनबाबत माहिती देताना असिस्टंट कमांडर स्वप्निल पवार म्हणाले, रॅपिड अॅक्शन फोर्स ही CRPF ची विशेष प्रशिक्षित आणि आधुनिक शस्त्रांनी सज्ज अशी बटालियन आहे. ही बटालियन विजयकुमार वर्मा यांच्या नेतृत्वात हैद्राबाद येथे कार्यरत असून सध्या ही बटालियन familiarization exercise साठी सोलापूर जिल्ह्यात आलेली आहे. या अंतर्गत सोलापूर शहर व ग्रामिण मधील विविध तालुके फिरुन जेथे पूर्वी जातीय, धार्मिक तणाव निर्माण होऊन दंगली झालेल्या आहेत, अशी संवेदनशील ठिकाणे, वादग्रस्त वास्तू, landmarks अशा ठिकाणी भेट देऊन तेथील कायदा सुव्यवस्था संदर्भातील माहिती संकलित करुन केंद्राकडे पाठविणार आहे. किमान बळाचा वापर करुन दंगल आटोक्यात आणण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी या माहिती संकलनाचा उपयोग होणार आहे.
येथील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासन सक्षम आहे. विशिष्ट परिस्थितीतील मागणीनुसार व गृहमंत्र्यांच्या आदेशानंतरच आमची बटालियन तैनात केली जाते असेही स्वप्निल पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

