![]() |
बार्शी विशेष : बार्शी सोलापूर रस्त्यावर किराणा सामान घेण्यासाठी गेलेल्या स्कूटीचालकाची क्रेनशी धडक झाल्यामुळे घडलेल्या अपघातात स्कूटीचालक जखमी झाल्याची घटना दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराचे सुमारास घडली. किरण अरुण कंगले (वय 39), रा. बालाजी कॉलनी, सोलापूर रस्ता, बार्शी असे अपघातात जखमी झालेल्या स्कूटीचालकाचे नांव आहे.
किराणा सामान घेण्यासाठी कंगले गेले असता बार्शी सोलापूर रस्त्यावरील महावीर किराणा स्टोअर्स दुकानासमोर एसटी स्टँडकडून येणाऱ्या क्रेन मशीनशी (क्र. एमएच-16-बीवाय-1278) त्यांची धडक झाली. त्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडल्याने त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
बार्शी शहर पोलिसांनी याप्रकरणी, स्कूटीचालक किरण कंगले, क्रेन मशीन चालक प्रदीप रामचंद्र ताटे (वय 36), रा. माळे वस्ती, अंजनगाव (उ), ता. माढा तसेच काही साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत.
स्कूटीचालक व साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार, एसटी स्टँडकडून येणारे पिवळ्या रंगाचे क्रेन मशीन (क्र. एमएच-16-बीवाय-1278) हे भरधाव वेगात येऊन रोडवरील स्पीड ब्रेकरवर आदळल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे स्कूटीवर धडकल्याने अपघात घडल्याचे नमूद केले आहे. तर क्रेन मशीन चालकाच्या जबाबानुसार, लाल रंगाची स्कूटी ही रोडवर थांबलेल्या ट्रकला ओव्हरटेक करुन राँगसाईडने समोरुन उजवीकडे आल्यामुळे हा अपघात घडल्याचे नमूद केले आहे.
पोलिसांनी चौकशी दरम्यान, हा अपघात स्कूटीचालकाने रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन राँगसाईडने आल्याने घडला असून, त्याने स्वतःचे ताब्यातील वाहन हयगयीने वाहन चालवून स्वतःला गंभीर जखमी करणेस कारणीभूत झाला आहे असे निष्पन्न झाले आहे असे म्हणत, स्कूटीचालकावर भा.दं.वि. १८६० कलम 279, 338 व मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
