![]() |
| Credit card fraud on the pretext of doing KYC; incident in Barsi |
बार्शी विशेष : क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने साडे एकोणीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना बार्शीत घडली. याबाबत शिवाजी अप्पासाहेब भोसले (वय ५०) रा. वाणी प्लॉट, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
दि. २० डिसेंबर रोजी मिळालेल्या नविन एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा गरजेनुसार उपयोग सुरू केलेला असतानाच, दि. २९ डिसेंबर रोजी भोसले यांना एका अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. त्यावर बोलणाऱ्या व्यक्तिने आपल्या क्रेडिट कार्डची केवायसी करायची आहे, मी विचारतो त्याप्रमाणे दुपारी तीन वाजेपर्यंत माहिती द्या अन्यथा पांच हजार रुपये दंड होईल असे सांगितले.
भोसले यांनी विचारलेली माहिती दिल्यावर त्याने एनीडेस्क नांवाचे अॅप डाऊनलोड करायला सांगितले. ते इन्स्टॉल केल्यानंतर आलेला कोड त्या व्यक्तीने विचारुन घेतला.
त्यानंतर काही वेळेतच त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन साडे एकोणीस हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचा मेसेज आला. तेव्हा भोसले यांनी त्या व्यक्तीने कॉल केलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो क्रमांक बंद झालेला होता.
