Thieves break into ATM machine, steal Rs 23 lakh
बार्शी विशेष : परांडा रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी २२ लाख ९५ हजाराची रोकड पळवली. १ डिसेंबरच्या पहाटे चार ते साडे चारचे दरम्यान ही घटना घडली. बँकेचे कॅश ऑफिसर रोहित लक्ष्मण देवगुंडे (वय ३०) रा. पवार प्लॉट, उपळाई रस्ता, बार्शी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
१ डिसेंबर रोजी पहाटे चार ते साडेचारचे दरम्यान परांडा रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पांढऱ्या रंगाच्या वाहनामधून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी सेंटरच्या बाहेरील आणि आतील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यावर काळा रंगाचा स्प्रे मारला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून आतील कॅश ड्रॉवरसह २२ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम घेवून चोरटे आलेल्या वाहनातून पसार झाले.
यासंदर्भात एसबीआयच्या मुंबई येथील सेंट्रलाईज्ड सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणेकडे संपर्क साधला असता, सीसीटीव्ही फूटेजवरुन पहाटे ४.२१ ते ४.३० चे दरम्यान चोरीची घटना घडल्याचे दिसून आले. तसेच २५ ते ३० वयाच्या सडपातळ बांधा असलेल्या एका चोरट्याने निळ्या रंगाची पँट व हुडी जॅकेट घालून, तोंडाला काळ्या पांढऱ्या रंगाचा मफलर गुंडाळल्याचे व त्याच्या साथीदाराने लाल रंगाचा हाफ टीशर्ट घातल्याचे दिसून आले.
दरम्यान, सोलापूर येथून आलेल्या श्वान पथकातील श्वान घटनस्थळाच्या आसपास घुटमळल्यामुळे चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. घटनेचा अधिक तपास उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.