| The unfortunate death of a disabled child from Chikharde during the hunger strike |
बार्शी विशेष : दिव्यांगांना मिळणारा शासकीय निधी मिळत नसल्याच्या कारणावरुन चिखर्डे, (ता. बार्शी) येथे उपोषणास बसलेल्या कुरुळे कुटुंबियांतील संभव रामचंद्र कुरुळे या दहा वर्षीय मुलाचा उपोषणादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला.
कुरुळे कुटुंबियांनी चिखर्डे येथील स्मशानभूमीत १५ नोव्हेंबर पासून उपोषण सुरु केले होते. त्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या दिव्यांग बालकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुरुळे यांनी केला आहे. मागील तीन महिन्यापूर्वी कुरुळे कुटुंबियाने केलेल्या उपोषणादरम्यान त्यांची मुलगी वैष्णवी हिचा मृत्यु झाला होता. त्यावेळी प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु तीन महिने उलटले तरीही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने कुरुळे कुटुंबियांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते.
यावेळी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी पोलिसांसमोर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका कुरुळे कुटुंबिय व नातेवाईकांनी घेतली होती. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सर्व संबंधितांची एक महिन्यात चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने कुरुळे कुटुंबियांनी अखेर सायंकाळी त्यांच्या मुलावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
