दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाला लातूरहून पुण्याकडे निघालेल्या अमृता ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या बॅगा बसच्या मागील डिकीतून अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत साधना सचिन जाधव (वय ३०) रा. चिलवडी, ता. जि. उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर बस दि. १ मार्च २०२२ रोजी रात्री दोनचे सुमारास खांडवी गांवातील खांडेश्वर हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबली असता, बसमध्ये असलेल्या प्रवाश्यांनी डिकीतील सामान व्यवस्थित आहे का हे बघण्यासाठी बसचा ड्रायव्हर, क्लिनर यांना डिकी उघडण्यास सांगितली. तेव्हा सुमारे पांच प्रवाश्यांच्या बॅगा चोरीस गेल्याचे आढळले. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.