चिठ्ठी दाखवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळयातील मिनी गंठण व सोन्याची चेन हिसका मारुन चोरट्यांनी पळविण्याचा प्रकार बार्शीत भर दिवसा घडला.
दि. २ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याचे सुमारास, बार्शीतील कासारवाडी रोड येथे रहाणाऱ्या सौ. मैनाताई बाळासाहेब सुरवसे (वय ५५) या आपल्या नातीला शाळेच्या स्कूलबसमध्ये सोडण्यासाठी शांतीनगर कॉर्नर, कासारवाडी रोड येथे गेल्या होत्या. नातीला स्कूलबसमध्ये बसवून त्या घराकडे पायी चालत निघाल्या असता, समोरुन एका काळया रंगाच्या मोटारासायकलवरुन दोन तरुण येऊन त्यांच्यापासून काही अंतरावर थांबले.
त्यापैकी मागे बसलेला वीस ते पंचवीस वयोगटातील, मध्यम शरीरबांधा असलेला, निळया रंगाची जिन्स व पांढरे रंगाचा शर्ट घातलेला, डोक्यावर टोपी व चेह-यावर निळया रंगाचा रुमाल बांधलेला अश्या वर्णनाचा एक तरुण मुलगा पायी चालत त्यांच्याजवळ आला. तो मुलगा जवळ आल्यामुळे त्या थांबल्या असता, त्या मुलाने हातातील एक चिठ्ठी दाखवत येथे कुसूम बंगला कुठे आहे असे विचारण्याच्या बहाण्याने गळयात हात घालून, गळयातील मिनी गंठण व सोन्याची चेन हिसका मारुन तोडून सोबतच्या जोडीदारासह मोटारसायकलवरुन पोबारा केला. याबाबत बार्शी पोलीसांत दोन अज्ञातांविरुध्द भा.दं.वि. ३४, ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.