खंडित वीज पुरवठा व सक्तीची बिल वसूली थांबवा अन्यथा ४ मार्चला आक्रोश मोर्चा : शेतकरी संघटना

Admin
0


एकीकडे  शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा मिळत नसतांना महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडीत करुन, सक्तीची वीजबिल वसूली सुरु आहे. 

दर तीन महीन्याला प्रती हॉर्सपावर एक हजार रुपये वसूली बेकायदेशीर असून, या वसूलीसाठी बेकायदेशीररित्या संपूर्ण रोहित्र बंद केल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. 

यामुळे वारंवार वीज बंद करुन सक्तीची बील वसूली तत्काळ बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन बार्शी तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार सुनील शेरखाने यांचेकडे देण्यात आले.

या निवेदनात शेती पंपाचा वापर नसूनही लाखो रुपये खोटी थकबाकी दाखवली जाते, शेती पंपास पूर्ण क्षमतेने विज मिळत नाही, एखाद्या डिपीवर अधिक लोड झाल्यास कंत्राटदार प्रती कोटेशन धारकाकडून तीस हजार रुपयांप्रमाणे विनापावती विनापरवाना पैसे घेऊन नवीन ट्रान्सफार्मर दिला जातो, जळालेला डिपी कंपनी बदलून देत नाही, खाजगी कंपनीकडून डिपी विकत घेण्यास भाग पाडले जाते, अनधिकृत विजपुरवठा करुन कंपनी व अधिकारी लाखो रुपये कमावत आहेत. 

या सर्व बाबीची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी,  व शेतकऱ्यांना पूर्ण आठ तास वीज देऊन नंतर वसूलीचा तगादा लावावा. असे न झाल्यास आम्हाला दि. ४ मार्च रोजी वीज कंपनीच्या कार्यालयवर आक्रोश मोर्चा काढावा लागेल, असे शेतकरी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)