आजच्या ठळक घडामोडी | सोमवार दि. ९ मार्च २०२६ (Breaking News)

Admin
0

 

People celebrating India's T20 World Cup victory in Solapur with fireworks, Monday 9 March 2026.
भारताचा ऐतिहासिक विजय: सोलापूर जिल्ह्यात जल्लोष आणि ९ मार्चच्या ठळक घडामोडी


बार्शी विशेष : आजच्या ठळक घडामोडी | सोमवार दि. ९ मार्च २०२६ (Breaking News)


  • भारताचा विश्वचषकावर ऐतिहासिक विजय: २० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी मोठा पराभव करत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या. सलामीवीर संजू सॅमसनने धडाकेबाज ८९ धावा केल्या, तर इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १५९ धावांत गारद झाला. भारताकडून अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयामुळे सोलापूरसह देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला.

  • सोलापूर जिल्हा परिषद गटनेते निवड: सोलापूर जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाची निवड आज होणार आहे. भाजपला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले असून, येत्या १८ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटनेतेपदी विजयराज डोंगरे यांची, तर शिवसेना (शिंदे गट) गटनेतेपदी चरणराज चवरे यांची निवड करण्यात आली आहे.

  • डॉ. स्वर्णलता भिसीकर स्मृती ग्रंथ प्रकाशन: ज्ञान प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिसीकर यांच्या स्मरणार्थ 'स्वर्ण स्मृती दले' या स्मृती ग्रंथाचे आणि त्यांनी लिहिलेल्या 'स्वामी रंगनाथ रंगजी' यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते सोलापुरात झाले. यावेळी प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित 'ध्येयाचा सुगंध' हे नाटक सादर केले.

  • जागतिक महिला दिन साजरा: सोलापूर शहरात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. हिराचंद नेमचंद वाचनालयात वैशाली सुरवसे यांचे शिल्प साकारण्यात आले, तर सायकल रायडर सोलापूर ग्रुपतर्फे सायकल रॅली काढण्यात आली. तसेच, विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांचा महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला.

  • सोलापूर-मुंबई विमान सेवेच्या फेऱ्यात कपात: प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने स्टार एअर कंपनीने सोलापूर-मुंबई विमान सेवा सात दिवसांऐवजी पाच दिवस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार आणि बुधवारची सेवा रद्द करण्यात आली आहे. मात्र, गोवा-सोलापूर सेवेला चांगला प्रतिसाद असल्याने ती आठवड्यातून चार दिवस सुरू राहील.

  • लोकमंगल साहित्य पुरस्कार जाहीर: लोकमंगल फौंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यंदा प्रसाद कुमठेकर (वसई), परीक्षित सिद्धभट्टी (बुलढाणा), चित्रा पालेकर (मुंबई) आणि मयुरेश्वर कुलकर्णी (पुणे) यांच्या साहित्यकृतींना जाहीर झाला आहे. २१ मार्च रोजी अशिष शेलार यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. बार्शीतील ज्ञानेश्वर जाधवर यांच्या 'शून्य रेषा' या विज्ञान कादंबरीलाही विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • उन्हाचा कडाका वाढला: सोलापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून काल ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • साहित्य संवाद कार्यक्रम: 'प्रिसिजन वाचन अभियान' अंतर्गत ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांच्याशी साहित्य संवाद रंगला. यावेळी त्यांनी लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे आणि अशोक कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

  • रंगपंचमीचा उत्साह: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. सोलापुरात लोधी समाजातर्फे रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली, तर पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पारंपरिक पद्धतीने देवावर गुलाल उधळून सण साजरा करण्यात आला.

  • अक्कलकोटला दररोज पाणीपुरवठा: कुर्नूर ते अक्कलकोट जलवाहिनीचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार असून, ऑगस्टपासून अक्कलकोट शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले आहे. ७५ कोटींच्या या योजनेचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

  • पंढरपूर-मंगळवेढा विकासकामांसाठी निधी: राज्याच्या अर्थसंकल्पात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी ५०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल आणि चंद्रभागा नदीवरील नवीन पुलाच्या कामांचा समावेश आहे.

  • सोलापूर महापालिकेला २४ टक्के दंड: इंदिरा गांधी स्टेडियम भाडेतत्वावर देताना मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेला २४ टक्के दंड करण्यात आला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला हे स्टेडियम ३० वर्षांच्या कराराने देताना साडेतीन कोटींचे शुल्क बुडवल्याचे समोर आले आहे.


स्त्रोत : सोलापूर आकाशवाणी



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)