बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील पांगरी येथे विनापरवाना डिझेलची वाहतूक आणि गावोगावी जाऊन बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका इसमावर पांगरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत ४६० लिटर डिझेलसह एक महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आखाती युद्ध सुरू असल्याने देशात पेट्रोलियम पदार्थांची टंचाई भासू नये, यासाठी शासनाने अनधिकृत वितरणावर कडक पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टँकरद्वारे विनापरवाना डिझेलची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती बार्शीचे तहसीलदार यांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशावरून पुरवठा विभागाचे ऋषीकेश धनवडे आणि अमित शेळवणे यांनी पांगरी येथे जाऊन खात्री केली असता, येडशी ते बार्शी जाणाऱ्या रोडवरील हॉटेल जय भवानी समोर एक संशयास्पद महिंद्रा पिकअप गाडी (क्र. MH-25-AJ-8025) उभी असल्याचे दिसून आले.
४६० लिटर डिझेल जप्त
पथकाने सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात ४६० लिटर डिझेलचा साठा आढळून आला, ज्याची अंदाजे किंमत ४१,७३१ रुपये आहे. वाहन चालक अजय भारत कसबे (रा. मोहा, ता. कळंब) याच्याकडे विचारणा केली असता, त्याने हे डिझेल गावोगावी जाऊन विक्री करत असल्याचे कबूल केले. मात्र, डिझेल वाहतूक आणि विक्रीचा कोणताही वैध परवाना त्याच्याकडे नसल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीवर गुन्हा दाखल
याप्रकरणी गोदाम व्यवस्थापक ऋषीकेश सुभाष धनवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजय कसबे याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश नागनाथ दळवी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
