![]() |
| गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सतर्क |
बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तालुक्यात गॅस सिलेंडरचा कोठेही तुटवडा भासणार नाही, या दृष्टीने नागरिकांनी अतिरिक्त साठवणूक न करता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बार्शीचे तहसीलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
दक्षता पथकाद्वारे नियंत्रण
गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर 'दक्षता पथक' गठीत करण्यात आले आहे. हे पथक गॅस एजन्सीच्या साठ्याची नियमित तपासणी करून दैनंदिन आवक-जावकवर लक्ष ठेवणार आहे.
OTP पडताळणी अनिवार्य
सध्या तालुक्यात इंडियन गॅस, भारत गॅस आणि एचपीसीएल (HPCL) अशा एकूण ८ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. गॅस सिलेंडरचा दुरुपयोग टाळण्यासाठी कंपनीमार्फत मिळणाऱ्या OTP (One Time Password) ची पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांनी सिलेंडर घेताना OTP ची खातरजमा करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
