(संग्रहित चित्र)
Preparations for counting of votes in Barshi; Police appeal for peace
बार्शी विशेष : २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बार्शी विधनासभा निवडणूकीच्या मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, उपळाई रस्त्यावरील शासकीय गोदामात ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
२३ नोव्हेंबर (शनिवार) रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. सुरुवातीस पोस्टल मतांची मोजणी करुन नंतर ईव्हीएम मधील मतमोजणी सुरु होईल. ईव्हीम मतमोजणीसाठी १४ टेबल तर पोस्टलसाठी १० टेबल असतील. एकूण २४ फेऱ्यामध्ये मतमोजणी पार पडेल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरिक्षक याप्रमाणे दीडशे कर्मचाऱ्यांचा या प्रक्रियेत सहभाग असेल. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
शासकीय गोदाम परिसरात बॅरिकेडींग करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा परिसर मोबाईल प्रतिबंधित म्हणून घोषित करून येथे १४४ कलम जारी करण्यात आले आहे. याठिकाणी ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.
शनिवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन बार्शीचे पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे यांनी केले आहे.